ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि.नांदेड)- अर्धापूर तालुक्यातील तब्बल 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करा, असा आदेश अर्धापूर न्यायालयाने दिला आहे. या कारवाईत शिक्षक आणि ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी न्यायालयाकडे याबाबतची मागणी केली होती. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने कारवाईची ही राज्यातील बहुधा पहिलीच घटना असावी.
अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषतः शिक्षक आणि ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाली. यानंतर आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी अनेक तक्रारी करुन मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. तरीही तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी टाळाटाळ होत होती तर तक्रार मागे घेण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्यांवर दबाव तंत्राचाही वापर केला जात होता, अशी माहिती त्यांनी दिली. 8 जानेवारी 2020 रोजी मुख्यालयी न राहणाऱ्या आणि घरभाडे भत्ता नियमित उचलणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करु दोषींविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते.
या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी मिना रावताळे यांनी दिले होते. त्यावरुन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे मग सय्यद युनुस पार्डीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्धापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील 319 कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्रे सादर करुन प्रति माह अंदाजे 14 ते 15 लाख रुपये प्रमाणे दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये शासनाकडून उचलत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. तरीही त्यांना यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
या प्रकरणी अखेर त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ए आर चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात 30 मार्च 2022 रोजी सय्यद युनूस यांनी कारवाईची मागणी करणारा दावा दाखल केला होता. न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिले आहेत.
अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलतात. याकडे साधारणपणे दुर्लक्ष असते. पण सर्वसामान्य माणसाच्या करातून ही रक्कम जात असते. सदरील प्रकरणे दुर्लक्षित असतात. पण अर्धापूर न्यायालयाने 156/3 सीआरपीसी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केले असून राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असावी अशी प्रतिक्रिया अॅड. ए आर चाऊस यांनी दिली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻