ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कपडा बांधून चोरी
नांदेड/ हिमायतनगर- मोटारद्वारे डिझेलचा उपसा करून 10 मिनिटांत अडीच लाख रुपयांच्या 3 हजार लिटर डिझेलची चोरी करण्यात आल्याचा प्रकार हिमायतनगर येथे घडला आहे. यावेळी चोरट्यांनी पंपावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कपडा बांधून ही चोरी केली.
भोकर- हिमायतनगर रस्त्यावर असलेल्या दवणे पेट्रोल पंपावर 20 फेब्रुवारीच्या पहाटे 1 वाजून 50 मिनिटे ते 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ऑटोमेशन पाईपमध्ये पाईप सोडून तीन हजार लिटर डिझेल चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिमायतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर- हिमायतनगर रस्त्यावर परिक्षित दवणे राहणार गारखेडा, औरंगाबाद यांचा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंंप आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर कपडा बांधून ऑटोमेशन पाईपमध्ये पाईप सोडून टाकीमधील तीन हजार लिटर डिझेल मोटार पंपाच्या साहाय्याने उपसा करून एका वाहनाद्वारे चोरून नेले. या पेट्रोलपंपावर कार्यरत असलेले कर्मचारी गजानन वडपत्रे आणि अंकुश गडपाळे हे दोघेही गाढ झोपेत असताना ही चोरी झाली.
पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या ज्वारीच्या पिकातून कच्चा रस्ता करून चोरट्यांनी हे डिझेल पळविल्याची तक्रार परिक्षीत दवणे यांनी दिली आहे. पेट्रोल पंप आणि चोरीसाठी थांबवलेल्या वाहनाचे अंतर हे जवळपास तीनशे फूट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेली ऊसतोड टोळीही यावेळी झोपेत असल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही चोरी दहा मिनिटांमध्ये करण्यात आली. तब्बल दोन लाख 86 हजार 934 रुपये किंमतीचे तीन हजार लिटर डिझेल चोरट्यांनी यावेळी चोरून नेले.
याप्रकरणी परिक्षित दवणे यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपास पोलीस हवालदार अशोक सिंगनवाड करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील पेट्रोल पंप धारकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻