ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- मोठ्या फाटाफुटीनंतर नांदेडमध्ये शिवसेनेत अनेक दिवसांनी जल्लोषाचे वातावरण दिसून आले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले माजी खासदार सुभाष वानखेडे हे स्वगृही परतले असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले आहे. पक्षात प्रवेश करून आज ते नांदेडला परतल्यानंतर शिवसैनिकांनी रेल्वे स्टेशनवरूनच त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. एकीकडे एकामागून एक हादरे बसत असताना माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा शिवसेना प्रवेश शिवसैनिकांचे मनोबल वाढविणारा ठरला आहे.
पूर्वाश्रमीचे शिवसेना माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी बुधवार दिनांक 20 जुलै रोजी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आज गुरुवार दिनांक 21 जुलै रोजी ते रेल्वेने नांदेडला आले. त्यांचे शिवसैनिकांनी उत्साहात जंगी स्वागत केले.
शिवसेनेत तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार राहिलेले सुभाष वानखेडे हे मागील काही दिवसांपासून भाजप व त्यानंतर काँग्रेसमध्ये कार्यरत होते. परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. काँग्रेसकडून त्यांनी 2019 मध्ये हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवली होती. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सुभाष वानखेडे यांनी लगेच आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसोबत मुंबई गाठली. शिवसेनेच्या अडचणीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, प्रवीण जेठेवाड, भुजंग पाटील, बाळासाहेब देशमुख, संपर्कप्रमुख आनंद जाधव, बबनराव थोरात, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुळकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आज ते नांदेडमध्ये येताच रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते आसना बायपास दरम्यान सुभाष वानखेडे यांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर वाहनांचा ताफा हदगावकडे रवाना झाला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻