ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काल शनिवारपासून लागू झाली आहे. त्यातच राज्यातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेड जिल्ह्यात दाखल झाला आहे. मुखेडमध्ये एका अभियंत्याने कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिताही लागू झालेली असून राज्यातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हाही दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेंडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एल. जे. जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. उप अभियंता जाधव यांच्यावर 91- मुखेड विधानसभा मतदारसंघातील झोन क्रमांक 25 निवळीकरिता क्षत्रिय अधिकारी पदाची नियुक्ती दिली होती. 2 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या निवडणूक कार्यशाळेत ते गैरहजर राहिले. त्यानंतर व्हीएम टू, व्हीएम थ्री हा अहवालसुद्धा त्यांनी पाठवला नाही. उलट पाठविलेल्या नोटिसीला उत्तर सुद्धा दिले नाही.
अखेर या प्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगच्या सूचनेनुसार आपले कर्तव्य केले नसल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेडचे नायब तहसीलदार अशोक लबडे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कलम 134 लोकप्रतिनिधी अधिनियम 1991 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार गोटे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻