ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अंबाजोगाई (जि. बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचे वडील तथा ज्येष्ठ शेकाप नेते बाळासाहेब (नाना) चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते.
बाळासाहेब नाना चव्हाण हे शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्ह्यातील जेष्ठ नेते होते. शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील, दिवंगत नेते एन.डी. पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. बीडसह संपूर्ण राज्यात त्यांनी शेतकरी, कष्टकरी कामगारांसाठी सातत्याने लढा दिला. बीड जिल्ह्यात शेकापच्या माध्यमातून ‘लाल-बावटा’ची चळवळ त्यांनी जिवंत ठेवली. शोषित, वंचित घटकांचे त्यांनी विविध स्तरावर नेतृत्व केलं. त्यामुळे ते भाई बाळासाहेब नाना या नावाने ओळखले जात. ते फर्डे वक्ते होते. त्यांच्या भाषणाच्या अनोख्या शैलीमुळेही बीड सह राज्यभरात सुपरिचित होते. अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या त्यांच्या मूळ गावचे ते अनेक वर्षे बिनविरोध सरपंच होते.
१९७२ च्या दुष्काळात त्यांनी हातोल्यासह बीड जिल्ह्यातील जनतेच्या हाताला काम मिळवून दिले होते. गावातील अनेक भांडण-तंटे निःपक्षपातीपणे ते मिटवत. एकाचवेळी असंख्य भूमिका ते बजावित असल्यामुळे ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तसेच मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आज सोमवारी त्यांच्या पार्थिवावर मूळगावी हातोला (ता.अंबाजोगाई) इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकाप कार्यकर्त्यांनी ‘बाळासाहेब नाना यांना लाल-सलाम’ तसेच ‘बाळासाहेब नाना अमर रहे’ अशी घोषणा यावेळी दिल्या. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांचा श्रद्धांजली अर्पण करतानाच शोक संदेश वाचून दाखविण्यात आला. अंत्ययात्रेस बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर उर्फ पापा मोदी, केजचे माजी आ. पृथ्वीराज साठे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, माजी आमदार संजय दौंड, लातूरचे यशवंत पाटील, लक्ष्मणराव मोरे, दिलीप पाटील, दिलीप माने, लालासाहेब चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, प्रा.टी.पी.मुंडे, अजय मुंडे, भाजपचे रमेश आडसकर, शेकापचे बीड जिल्हा चिटणीस बाळासाहेब डुमरे, राजेंद्र नवले, भगवानराव देशमुख, वैजनाथ खांडके, दत्ता पाटील यांच्यासहीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻