ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी- बाळासाहेब थोरात यांची माहिती
◆ ‘भारत जोडो यात्रा’ ही राजकीय पदयात्रा नव्हे तर विकासाची एक जनचळवळ -अशोक चव्हाण
नांदेड– भाजपची राजनीती देश हिताची नाही असा आरोप करत काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा ही ऐतिहासिक असून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले व सर्वोत्कृष्ट नियोजन अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भारत जोडो यात्रा ही राजकीय पदयात्रा नसून ती विकासाची एक जनचळवळ असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, या यात्रेच्या काळात राहुल गांधी यांचा नांदेड जिल्ह्यात तब्बल 6 दिवस मुक्काम असणार आहे.
काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात येत आहे. ज्या मार्गावरुन ही यात्रा जाणार आहे, त्या मार्गाची स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यांनतर आता या मार्गावरील यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रमेश बागवे तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांनी केली.
भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी महाराष्ट्रात कशी सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी या यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक काँग्रेस नेते नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता आज रविवार दि. ऑक्टोबर रोजी सकाळी येथील कै. शंकराव चव्हाण मेमोरियलमधील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी होत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रभारी संपतकुमार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती रेखाजी, संध्या शंकवाले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे गोविंद पाटील नागेलीकर, डॉ. मीनल खतगावकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो ही पदयात्रा ऐतिहासिक असून केरळमध्ये तसेच कर्नाटकामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविधतेतून एकता हीच खरी देशाची ताकद आहे. महात्मा गांधींनी अशाच पद्धतीने देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. देशांमध्ये सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये बेरोजगारीचा उद्रेक, कारखानदारी नाही, महागाईचा भस्मासुर यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. या सबंध प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. या यात्रे संदर्भात महाराष्ट्राच्या नांदेड शहरातील देगलूरमध्ये यात्रेचे आगमन झाल्यानंतर देशात सर्वाधिक चांगली तयारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडचे नियोजन हे सर्वोत्कृष्ट असल्याचेही ते म्हणाले. देशामध्ये भाजपची राजनीती ही देश हिताची नाही. समाजा- समाजामध्ये वाद निर्माण करणारी असल्याचा आरोप श्री थोरात यांनी केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला सबंध देशभर चांगला प्रतिसाद मिळणार आहे. देशात एकता, बंधुत्व देश जोडण्यासाठी ही महत्त्वाची नांदी ठरणार आहे. ही यात्रा केवळ राजकीय पक्षाची नसून या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी होत आहेत. आपणही देश हितासाठी काही देणं लागतो या भावनेतून अनेक संघटना या यात्रेत एक दिवसापुरता का होईना, पण सहभाग घेत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. ही राजकीय पदयात्रा नसून ती विकासाची एक जन चळवळ असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत म्हणजेच बारा राज्य, दोन केंद्रशासित प्रदेश जवळपास 3, 570 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सध्या ही यात्रा 624 किलोमीटर अंतर पार करून पुढे आली आहे. सध्या मैसूरमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जवळपास पाच नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा नांदेडमध्ये येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यात्रा देगलूर- नायगाव- नांदेड- अर्धापूर- कळमनुरी- हिंगोली- वाशिम- अकोला- शेगाव- बुलढाणा- जळगाव आणि जांबुत, त्यानंतर मध्यप्रदेशात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात 368 किलोमीटर तर 18 रात्रीचे मुक्काम असणार आहेत. त्यात सहा मुक्काम फक्त नांदेड जिल्ह्यात असून 120 किलोमीटर नांदेड जिल्ह्यातून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत भाजपाकडून माझ्या बाबतीत अफवा पसरल्या जात आहेत त्या अफवांना उत्तर देणे मी योग्य समजत नाही असेही अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या दोन्ही महापुरुषांना त्यांनी सुरुवातीलाच अभिवादन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻