ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
व्हिडिओ 👇🏻
नांदेड– हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयातील 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर भेट दिली. यावेळी रुग्णालयातील प्रचंड अस्वच्छता व दुर्गंधी पाहून संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी डीनच्या हातात चक्क झाडू देऊन त्यांना शौचालय साफ करण्यास लावले. यावेळी त्यांनी स्वतःही हातात पाण्याचा पाईप धरून सफाई केली.
येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात जवळपास 30 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने संबंध महाराष्ट्र हादरून गेला आहे. यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. आवश्यक तो औषधी पुरवठा नसल्याने रुग्ण सेवा करता आली नाही असा बचाव करीत अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे यांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला. परंतु 16 नवजात अर्भक आणि इतर रुग्ण मृत झाले त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांतून विचारला जात आहे.
या गंभीर प्रकारानंतर हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आज मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी शासकीय रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णालयात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पाहून त्यांनी तातडीने डीन यांना बोलावून त्यांच्या हातात झाडू देऊन स्वतः शौचालय साफ करण्यास लावले. विशेष म्हणजे यापूर्वीही खासदार हेमंत पाटील हे आमदार असताना त्यांनी डीन डॉक्टर वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन अशाच प्रकारे शौचालय साफ करण्यास भाग पाडले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे आज दिसून आले. भविष्यात रुग्णालयात अस्वच्छता आढळून आल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा त्यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिला आहे.
एकंदरीत या घटनेमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अजूनही 70 रुग्ण अतिगंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर तात्काळ योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या ट्रस्टने आपल्यावर सरकारने टाकलेली जबाबदारी पोटकंत्राटदारावर टाकलेली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेही औषधी पुरवठा वेळेवर होत नसल्याचे बोलले जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻