ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर: निलंगा तालुक्यातील केदारपूर येथील एका विवाह सोहळ्यात जेवणातून जवळपास २५० जणांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विषबाधेनंतर मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालये गाठली.
निलंगा तालुक्यातील केदारपूर येथील वधूचा विवाह, देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलासोबत केदारपूर इथे रविवारी पार पडला. केदारपूर ग्रामस्थांसोबत काटेजवळगा, अंबुलगा बु, सिंदखेड या गावातील ग्रामस्थ वऱ्हाडी म्हणून उपस्थित होते. लग्नानंतर अनेक वऱ्हाडींनी जेवण केले. मात्र काही वेळानंतर जेवण केलेल्यांपैकी गावातील सुमारे २५० जणांना उलटी-जुलाब-मळमळ असा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी अंबुलगा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. तर अनेकांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.
यापैकी अनेक रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. जवळपास २५० जणांनी उपचार घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती ही धोक्याबाहेर आहे.
वरणातूनच झाली विषबाधा ?
लग्नानंतर जेवणातून ज्यांनी तुरीचे वरण खाल्ले त्यांनाच ही विषबाधा झाल्याचे पुढे आलं आहे. तर वरण न खाणा-या वऱ्हाडींना काही त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्रास होणाऱ्यामध्ये लहान मुलं अधिक आहेत. पोटात दुखत मळमळ होऊन उलट्या जुलाबाचा त्रास झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. यातील त्रास झालेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे सुदैवानं अनर्थ टळला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रॕपीड रिस्पाॕन्स टिमसह जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी केदारपूरमध्ये दाखल झाले. ज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरूरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी , जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. अशुतोष वैरागे, अंबुलगा बु प्रा. आ. केंद्राच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत.
दरम्यान बाधितांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सध्या बाधितांची प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. त्यांच्यात सौम्य लक्षणे जाणवत आहेत. तसेच सोमवारी सकाळी आणखी नवीन १० रूग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻