ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ दोन बॅगा भरून पसार झालेल्या दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही पळवला
◆ तपासासाठी विशेष पथकं तैनात, लातूरसह परिसरातील जिल्ह्यात नाकाबंदी
लातूर : लातूर शहरातील कातपूर रोड भागातील कन्हैय्या नगरी परिसरातील राजकमल अग्रवाल यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. बंदूक, चाकू आणि कत्तीचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला असून यात पाच दरोडेखोरांनी अग्रवाल यांच्या घरातील जवळपास सव्वा दोन कोटींची रोख रक्कम आणि सुमारे एक ते दीड किलो सोनं लुटलं आहे.
लातूर शहरातील कातपूर रोड परिसरात भागात व्यापारी राजकमल अग्रवाल यांचे घर आहे. त्यांचा हार्डवेअर तसेच कलर पेन्टचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचा घरी मध्यरात्री अडीच ते पहाटे पावणे चारपर्यंत दरोडेखोरांचा धुडगूस सुरु होता. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे ज्यात पिस्टल, चाकू, कत्ती होती. घरात घुसल्यानंतर राजकमल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीला शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी सर्व माहिती विचारली. घरातील रक्कम, सोन्याचे दाग-दागिने तात्काळ न दिल्यास एक-एकाला जीवे मारण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. त्यानंतर अग्रवाल कुटुंबियातील इतरही सदस्यांना उठवून सर्व सदस्यांना दरोडेखोरांनी घरातील हॉल मध्ये बसविले. त्यानंतर जवळपास एक ते सव्वा तास दरोडेखोरांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेत लूट केली. ज्यात जवळपास ०२ ते सव्वा कोटींची रोख रक्कम तसेच घरातील सुमारे एक कोटी रुपयांचे सोनं-दागदागिने असा एकूण तीन कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचे सांगण्यात येत आहे.
अग्रवाल यांच्या घरातील दोन बॅग भरून त्यांनी रोख रक्कम आणि सोनं पळविले. दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा तसेच डीव्हीआरही पळविला. मात्र अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे हे गेल्या काही महिन्यापासून बंद असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. याची माहिती कळविल्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लातूर जिल्ह्यात नाकाबंदी केली. लातूरसह शेजारील नांदेड, उस्मानाबाद, बीड, सोलापूरमध्येही नाका बंदी करण्यात आली होती.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भेट दिली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. याप्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेची माहिती सर्वत्र समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. लातूर शहराच्या हद्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याचेही बोलले जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻