ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
औसा (जि. लातूर): महाभारतापासून आपल्या देशात ‘काका-पुतण्या’ वादाची प्रदीर्घ परंपरा आहे. तशी ही परंपरा गेल्या काही दशकात राजकारणातील अनेक काका-पुतण्यांच्या वादातून अधिक रंगलेली आपण पाहिली आहे. तसाच काहीसा वाद लातूर जिल्ह्यातील ‘काका पुतण्या’ तही रंगला. आणि तब्बल तीन तास चाललेल्या पुतण्याच्या ड्राम्यामुळे काकासह संपूर्ण गावचा जीव टांगणीला लागला होता.
ही घटना आहे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील बुधोडा गावच्या काका-पुतण्याची! तसे हे काका-पुतण्या अराजकीय आहेत. बुधोडा येथील चांद इसबू शेख या २५ वर्षीय तरुणाच्या काकाने सामायिक शेत जमीन विकली. त्यावेळी चांद च्या हिश्श्याची रक्कम किंवा दुसरीकडे शेत जमीन घेऊन देण्याचे आश्वासन काकाने दिले. मात्र दिवसामागून दिवस गेले. काका कडे अनेकदा तगादा लावूनही आपला हिस्सा मिळत नसल्याने रागाच्या भरात पुतण्या चांद ने बुधोडा येथील एका मोबाईल टॉवर वर चढून आत्महत्येचा ईशारा दिला.
अचानक एक तरुण टॉवर वर जाऊन बसल्याचे समजताच अनेकांनी मोबाईल वर व्हिडिओ काढले. काहींनी पोलिसांनाही कळवले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. काका-पुतण्याच्या वादाचा हा ड्रामा तब्बल तीन तास चालला. तीन तासानंतर काका-पुतण्यात समेट घडल्यामुळे पुतण्याने केलेलं बंड अखेर शमलं. मात्र भर उन्हात तीन तास ‘चांद’ ने संपूर्ण गावासह काकांनाही हकनाक ‘तारे’ दाखविल्यामुळे औसा पोलीस आता चांद इसबु शेख वर कारवाईच्या पवित्र्यात आहेत. आता पोलीस या ‘चांद’ शेखला भारतीय दंड विधानाच्या विविध कलमातून काय ‘तारे’ दाखवतात याची सर्वांना उत्सुकता आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻