ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांची भेट
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- गुरुगोविंद सिंग यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या नांदेड नगरीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोकाभिमुख आणि लोकांना न्याय देणारे आमचे सरकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नांदेडच्या मालेगाव रोडवर असलेल्या भक्ती लॉन्स येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भाजपाचे चैतन्य बापू देशमुख, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरजेगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेले उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, संध्या कल्याणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन सोमवार दि. आठ आगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाला सभास्थळी झाले. सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यानंतर शहरातील मूलभूत सुविधांच्या कामाचे नांदेड- निळा रस्त्याचे आणि पासदगाव येथील आसनापुलाच्या जवळपास 192 कोटीच्या कामाचे सभास्थळीच भूमिपूजन केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. या भूमीसाठी विकास करण्याची संधी मला आपण सर्वांनी मिळून दिली, तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनाही तुम्ही निवडून दिले. परंतु बालाजी कल्याणकर हे मला नेहमी म्हणायचे मतदार संघात माझ्या मनासारखे काम होत नाही, माझे कोणी ऐकत नाही, विकास निधी देत नाहीत, त्यामुळे मी मतदार संघातील मतदारांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्यांना न्याय देऊ शकत नाही. अखेर आम्ही विकासासाठी मोठी क्रांती केली आणि पन्नास आमदारांना घेऊन मी बाहेर पडलो. हे पन्नासही आमदार मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. बाळासाहेबांची आणि हिंदुत्वांची भूमिका घेऊन आम्ही पुढे आलो आहे. येणाऱ्या काळात लोकाभिमुख व लोकांना न्याय देणारे आमचे सरकार राहणार आहे. नांदेड शहरातील मूलभूत सुविधांसाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यासोबतच हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला जोडणारा नांदेड- निळा रस्त्यावरील पुलाला 145 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पासदगाव येथील आसना नदीवर असलेल्या फुलासाठी 32 कोटी रुपये निधी मंजूर करून केला असून असे 192 कोटीचे भूमिपूजन झाले असे त्यांनी जाहीर केले. तसेच महानगरपालिका क्षेत्रांतर्गत विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 358 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नांदेडच्या विकासासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेतून बाहेर पडलेले जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, शहर प्रमुख तुलजेश यादव यांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी आपल्या मनोगतात आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले की विकासाची गंगा आपल्या मतदार संघात आणण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यासोबत गेलो आहे. त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे आहोत असा त्यांनी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विठ्ठल- रुक्माईची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्यांना उभारी देणाऱ्या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी बँका होण्यासाठी शासन मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असून सर्वसामान्य माणसाला उभं करणाऱ्या अशा संस्थांचे बँकेत रुपांतर व्हावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन सोसायटी ही पतसंस्था न राहता तिचे बँकेत रूपांतर झाले पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. या संदर्शत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पाहिली ‘ उंच भरारी तुमच्या सोबत गोदावरी’ ही चित्रफीत
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयात ‘ घ्या उंच भरारी तुमच्यासोबत गोदावरी’ ही गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी 15 मिनिटाची चित्रफित मुख्यमंत्र्यांनी पाहिली. पाच राज्यात विस्तार, 85 शाखा ही संस्थेची कौतुकास्पद कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻