ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – लोकसभेचे काँगेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी नांदेडचा गड जिंकला आहे. भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा त्यांनी 59,413 मतांनी पराभव केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशानंतरही झालेला हा पराभव चिखलीकर, अशोकराव चव्हाण यांच्यासह भाजपसाठी धक्कादायक ठरला आहे.
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना 05 लाख 28 हजार 894 इतकी मते तर भाजप उमेदवार प्रताप प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 04 लाख 69 हजार 452 इतकी इतकी मतं मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना 92,513 मतं मिळाली आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे सुरुवात झाली. दिवसभर चाललेल्या या मतमोजणीत कधी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर पुढे, तर कधी काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण पुढे अशी स्थिती होती. पण काही फेऱ्यानंतर वसंतराव चव्हाण यांनी मतमोजणी सातत्याने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली अखेर काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा 59 413 मतांनी विजय झाला.
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काही निवडणुका वगळता लोकसभा निवडणुकीत तसा काँग्रेसचा गड मानला जात. मात्र यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपसाठी ही निवडणूक अगदीच एकतर्फी ठरेल. आणि काँग्रेस फारशी लढत देऊ शकणार नाही असेच सर्वांना वाटत होते. खा. अशोक चव्हाण यांनीही मोठ्या प्रमाणात सभा – बैठका घेत चिखलीकर यांच्या प्रचारार्थ मतदार संघ पिंजून काढला होता. मात्र काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आणि एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासह महाविकास आघाडीने अत्यंत नेटाने ही निवडणूक लढवून यश मिळविले आहे. अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर हे एकत्र येऊनही भाजपचा झालेला हा पराभव भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे.
विशेष बाब म्हणजे अशोक चव्हाण यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने मोठ्या प्रमाणात मतदान मिळवलेले आहे. वसंतराव चव्हाण यांच्या या विजयामुळे नांदेडचा गड काँग्रेसने परत मिळवला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻