ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नांदेड– रात्रीच्या गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहने अडवून लुटण्याच्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस, तीन खंजर, एक गुप्ती, दोरी, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बारड ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावर गॅस गोडाऊन परिसरात गोडसे यांच्या आखाड्याजवळ सात चोरटे दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले होते. यावेळी गस्तीवर असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाला ही माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना त्यांनी ही माहिती देऊन पुढील कारवाईसाठी सापळा लावला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सोनवणे यांनी आपले सहकारी हवालदार भानुदास वडजे, मारुती तेलंग, संजय केंद्रे, विठ्ठल शेळके, रवी बाबर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, विलास कदम, गणेश धुमाळ, अर्जुन शिंदे आणि कलीम शेख या पोलिसांनी प्रदीप ऊर्फ बंटी श्रीराम श्रावणे (वय 24) राहणार लक्ष्मी नगर पुसद जिल्हा यवतमाळ, संतोष उर्फ साईनाथ तरटे (वय 22) राहणार खोब्रागडेनगर अण्णाभाऊ साठे चौक नांदेड, रवी नामदेव गायकवाड ( वय २०) राहणार वेंकटेशनगर मुदखेड, चंद्रकांत उर्फ मुनीम गंगाधर सूर्यवंशी (वय 23) राहणार कृष्णानगर मुदखेड, अभिषेक उर्फ अभी त्र्यंबकराव नागरे (वय 19) राहणार गिरगाव मालेगाव हल्ली मुक्काम चैतन्यनगर नांदेड आणि एक विधि संघर्ष सोळा वर्षाचा बालक यांना अटक केली.
या टोळीतून आरोपींकडून अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस, तीन लोखंडी पाते असलेले खंजर, एक गुप्ती, २० फूट लांब दोरी, दोन दुचाकी असा एकूण 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घातक शस्त्र व अग्निशस्त्रसह या सर्वांना पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांनी बारड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या फिर्यादीवरून बारड पोलीस ठाण्यात दरोड्याचा व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक तूगावे करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आणि पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻