ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
किनवट (जि. नांदेड)- संशयास्पद असलेले वाहन अडविल्याने या आणि इतर वाहनातील १० ते १२ जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना किनवट तालुक्यातील इस्लापूरजवळ घडली आहे. यात ६ जण जखमी झाले असून याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट तालुक्याच्या इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पारावपेट परिसरात सोमवारी दि. १९ रोजी रात्री गोरक्षक कार्यकर्त्यांवर कसायांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इतर ६ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर शिवणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
किनवट तालुक्याच्या चिखली येथील सोपानरेड्डी पेंटेवार व त्यांचे सहकारी बोलेरो जीपने सोमवारी दुपारी तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील चातारा येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान सोपानरेड्डी व त्यांचे सहकारी चिखली गावाकडे परत येत असताना अप्पारावपेट जवळील कुंटाला- मलकजाम रस्त्यावर एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगात जात असल्याचे पेंटेवार यांना दिसले. सदर वाहनाबाबत शंका आल्याने पेंटेवार यांनी त्यांच्या चालकाला त्या वाहनाचा पाठलाग करायला लावला.
जीप रस्त्यात आडवी लावून पिकअप वाहन थांबवून पेंटेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिकअप वाहनचालकाला हटकले. त्याचवेळी वाहनात पाठीमागे बसलेले १० ते १२ कसाई खाली उतरले. वाहनात गोवंश होते. कत्तलीसाठीच सदर गोवंशांची वाहतूक होत असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी कसायांना जाब विचारला. याचदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सोपानरेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठ्या,काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेखर रापेल्ली याच्या छाती व बरगडीस गंभीर दुखापत झाली. तर इतरही ६ जण जखमी झाले. सर्व जखमींना पेंटेवार यांनी शिवणी आरोग्य केंद्रात आणले. गंभीर जखमी झालेल्या शेखर रापेल्ली या गोरक्षकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रथमोपचारानंतर इतर जखमींना नांदेडला हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड विभागाचे गोरक्षक किरण बिचेवार यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर अप्पारावपेट, शिवणी भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोपानरेड्डी पेंटेवार यांच्या फिर्यादीवरुन इस्लापूर पोलिसांनी अज्ञात १० ते १२ कसायांवर भादंविच्या कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १५९, ४२७ व शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻