ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नांदेड- महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे रेल्वे स्थानकावरून विधवा महिलेला बोगीत नेऊन तिच्यावर अत्याचार करून लूट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती याप्रकरणी समोर आली आहे. यात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी लुटलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
धर्माबाद रेल्वेस्थानकावर हायकोर्ट अर्थात मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे मुक्कामी थांबत असते. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या बाजूला याच मराठवाडा एक्स्प्रेसचा डबा उभा होता. दोन्ही आरोपींनी रेल्वे स्थानकावरून पीडित महिलेला याच डब्यात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय सिमा बोईने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन धर्माबाद गाठले. आणि आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना त्यांनी औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातमी:
शुक्रवारी दि. २१ दुपारी विधवा महिला आपल्या पतीच्या नावे बँकेत असलेले पैसे काढण्यासाठी उमरी येथून धर्माबादला गेली होती. सायंकाळी उशीर झाल्याने तिला उमरीकडे येण्यासाठी वाहन मिळाले नाही, म्हणून ती धर्माबाद रेल्वे स्थानकावर थांबली. ती एकटीच असल्याची संधी साधून सराईत गुन्हेगार असलेले अक्षय क्षीरसागर (वय 24) राहणार उमरी आणि भीमराव सर्जे (वय 32) राहणार येळेगाव, ता. धर्माबाद या दोन आरोपींनी तिच्याजवळ जाऊन जबरीने तिच्या जवळील 75 हजार रुपये किमतींचे सोन्याचे गंठण आदी चोरून घेतले. एवढेच नाही तर तिला रेल्वे स्थानकावर असलेल्या डब्यात नेऊन तिच्यावर या दोघांनी अत्याचार केला. ही घटना 21 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर पीडित महिलेने नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा हलवत धर्माबाद येथील दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी गु.र.न. 66/2022, कलम 294, 325, 376 (ड) भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धर्माबाद येथील घटनास्थळाला लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट दिली.
दोन्ही आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा बोयने यांनी औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास स्वतः एपीआय सीमा बोइने ह्या करीत आहेत. दरम्यान या धक्कादायक प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारांचा वावर बंद करण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻