ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर : “व्हॅलेंनटाईन डे” निमित्त गुलाबांच्या फुलांना मागणी जास्त असते व भावही चांगला मिळतो. त्यामुळे नगदी नफा मिळवून देणाऱ्या, प्रेम आणि आनंदाचं प्रतिक असलेल्या या गुलाबांच्या फुलांना कोरोना उतरणीच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगली मागणी आहे. फुलांची लागवड शेतकऱ्यांना निश्चितच फायदा देणारी ठरत आहे. नांदेड जवळच्या देगाव शिवारात सध्या गुलाब शेती फुलली आहे. व्हॅलेंनटाईन डे निमित्त गुलाब फुलांच्या शेतीमध्ये फुले तोडणीसाठी शेतकरी फुलशेतीमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
अर्धापूर तालुका सुपीक सदन भाग म्हणुन ओळखला जातो. पारंपारिक शेतीला फाटा देत इथल्या शेतकऱ्यांनी गुलाब निर्मितीचा प्रयोग केला आहे. देगाव येथील साईनाथ या उच्च शिक्षित तरुणाने शेतीव्यवसायात झेप घेतली आहे. त्यांनी गुलाबांची लागवड करून शेती फुलवली आहे. यामधून महिन्याला हजारो रूपयाचे उत्पन्न सुरू झाले आहे.
देगाव बु. येथील तीस वर्षीय साईनाथ जाधव यांना वडिलोपार्जित जमीन असून यामध्ये एक बोअर आहे. ठिक ठिकाणाहून शेतीविषयक माहिती घेऊन त्यांनी ४० गुंठ्यांत फुलशेती घेतली. ते चार वर्षापासुन गुलाब शेती करत आहेत. रोपांची लागवड केली. औषध फवारणी, तोडणीसाठी खर्च आला. परिसरातील शेतकर्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत जाधव यांना सहकार्य केले आहे. अभ्यासपूर्ण शेतीव्यवसाय केल्यास शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते हे साईनाथ जाधव यांनी केलेल्या शेतीवरून दिसून येते.
फुलशेती व्यवसायामधुन सरासरी महिन्याला वीस ते तीस हजारांचे उत्पन्न मिळते. फुलशेतीला गुलाबाची फुले चांगलीच लगडली असून दररोज फुले निघत आहेत. यामध्ये पुढेही वाढ होणार आहे. ते गुलाबाची फुले नांदेड येथील फुल मार्केटमध्ये विक्री करत असून ८० ते १५० रुपये प्रती किलो भाव मिळत आहे. दरम्यान खर्च वजा जाता महिन्याला २० ते ३० हजार महिना उत्पन्न मिळते असे साईनाथ जाधव यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास नवतरुण तरुणांना शेतीतून देखील भरघोस उत्पादन मिळू शकते, हे यावरून सिद्ध झाले आहे.कोरोना उतरणीच्या पार्श्वभूमीवर यंदा व्हॅलेटाइन डे निमित्ताने गुलाबांच्या फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फुल शेती करणारे शेतकरी योग्य भाव मिळाल्यामुळे यावेळी आनंदी आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻