ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र पोलीस प्रशासनाकडून मिरवणूकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही काही शिवभक्तांनी मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. आता पोलिसांनी या प्रकरणी शहर आणि जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
नांदेड शहर व जिल्ह्यात 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणूकींना पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. जिल्ह्यात सध्या कोरोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तसेच जमावबंदीचा आदेश सुरू असताना मिरवणुका काढण्यात आल्या. एवढेच नाही तर सुरक्षित अंतर न ठेवता, तोंडावर मास्क न लावता कोरोना या महामारीचा प्रसार होण्यास मदत होईल असे वर्तन करणाऱ्या शिवभक्तांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली ते ओव्हर ब्रिज येथे पन्नास ते साठ दुचाकी स्वाराने हिरा घाट चौकी मिरवणुकीचे आयोजन केले होते. या चौकी दरम्यान दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करून हयगय व निष्काळजीपणाने धोकादायकरित्या वाहने चालून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी पोलीस अंमलदार माधव मरकुटे यांच्या फिर्यादीवरून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरविंदरसिंग वाधवा यांच्यासह 50 ते 60 दुचाकीस्वाराविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार राठोड करत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवभक्तांनी विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय कांबळे करत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशवंतराव चव्हाण मराठा वसतीगृहासमोर नवीन मोंढा येथे शिवजयंती आयोजक व शिवभक्तांविरुद्ध विनापरवानगी शिवाजी महाराजांची जयंती काढणाऱ्या विरुद्ध पोलीस हवालदार रामराव ढोले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भोकर पोलीस ठाण्यातही माधव पाटील वडगावकर, आकाश घंटेवाड यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कराड करत आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हडको ते सिडको परिसरात आरोपीताने विनापरवानगी शिवजयंती मिरवणूक काढून आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी शुभम राजमाने, दिलीप कदम, संग्राम पाटील मोरे, बापूसाहेब पाटील, विश्वास हंबर्डे, शिवम घोरबांड, अनिल भोंग यांच्यासह आदी शिवभक्तांविरुद्ध पोलीस अंमलदार बाबू केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर पोलीस ठाण्यात प्रसाद चौधरी, रितेश सुर्यवंशी, वैभव जाधव, गणेश वाडेकर, विशाल शिंदे, नितेश राठोड, ऋषिकेश खंदारे, गजानन ठाकरे, शिवशंकर काटे, विठ्ठल राठोड, विनोद सूर्यवंशीसह 70 ते 75 जणांविरुद्ध पोलीस अंमलदार सुशील राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार करत आहेत.
हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तामसा टी पॉइंट येथे विनापरवाना मिरवणूक काढणाऱ्या शिवप्रसाद गणेश पोखरे, गजानन नथूराम तोडकर, सचिन दत्तराम शिंदे, सतीश सागर शिंदे, बाला देशमुख, सतीश सुदाम काळे, राहुल दिगंबर बिरदाळे, अरुण लिंगप्पा घोडेकर, संदीप नारायण देशमुख, शिवराज पाटील, विश्वजीत भाऊराव पवार, संदीप आढाव, शिवाजी जाधव, गजानन सोळंके, बालाजी यांच्यासह दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे यांनी दिली.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिजाऊनगर पाटीजवळ शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. याप्रकरणी अनिल गोविंद गिरी, प्रमोद माधव शिरसे यांच्यासह इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻