Friday, November 22, 2024

शिवसेनेने आमदारांच्या घरी जाऊन बजावले व्हीप; आमदार बालाजी कल्याणकर यांनाही तीन जिल्हाप्रमुखांनी घरी जाऊन व्हीप पोहोचवला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राज्यात सुरु असलेल्या राजकीय  घडामोडीनंतर शिवसेनेने मोठे पाऊल उचलले असून बंडखोर आमदारांना पक्षाचा व्हीप बजावण्यात आला आहे. बुधवार दिनांक २२ जून रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती देणारा हा व्हीप आज सकाळीच सर्व आमदारांना बजावण्यात आला. या बैठकीस आमदारांनी उपस्थित राहावे असा आदेश व्हीपमध्ये देण्यात आला होता. नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनाही उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप बजावण्यात आला. या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पुढची कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यामुळे शिवसेनेसमोरही पेचप्रसंग उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत बंडखोरांना शिवसेनेत वापस आणण्यासाठी आणि पक्षाची पुढची दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक “वर्षा” बंगल्यावर बोलाविण्यात आली होती. या बैठकीस आमदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून अत्यंत महत्त्वाच्या कामाचा लेखी पुरावा सादर केल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही असेही पक्षाने बजावलेल्या व्हीपमध्ये नमूद करण्यात आले.

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हीप बजावला आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांना बजावण्यात आलेला व्हीप घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे आणि  आनंदराव बोंढारकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील यांनी आमदार कल्याणकर यांचे निवासस्थानी जाऊन व्हीप देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर घरी नसल्याचे सांगण्यात आले.

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्या बालाजी कल्याणकर यांच्याशी जिल्हाप्रमुखांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अधिक माहिती विचारली असता आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर व्हीप आमदार बालाजी कल्याणकर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांच्या पुतण्याकडे देण्यात आला. आ. कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुवाहाटीमध्ये आहेत, त्यामुळे ते सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट होते. तरीही आमदारांवर पुढील कारवाई करण्यासाठीचा कायदेशीर सोपस्कार शिवसेनेच्यावतीने आज अवलंबण्यात आले. आता या आमदारांवर काय कारवाई होणार किंवा पुढची घडामोड काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या व्हीपमुळे आमदारांवर अपात्रतेसारख्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!