Thursday, November 21, 2024

शिवसेनेने नांदेड जिल्ह्यात सुरू केले शिवसंपर्क अभियान; शिवसैनिक हा निधड्या छातीचा निखारा हवा- खासदार अनिल देसाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शिवसेनेने आजपासून नांदेड जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानास प्रारंभ केला आहे. या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत. यात शिवसंपर्क अभियान व जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजाला न्याय द्यायचा असेल तर पक्ष संघटन मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी निधड्या छातीचा निखारा असणारा शिवसैनिक असायला पाहिजे. येणाऱ्या काळात शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकजूट राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन शिवसेना सचिव तथा राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी नांदेड येथे केले. सबंध राज्यभर शिवसेना पक्ष मजबुतीसाठी शिवसंवाद दौरा आयोजित केला आहे. यानिमित्त शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई मंगळवार आणि बुधवार नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते कै. वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोजराज भण्डारी, प्रकाश मारावार, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, गोदावरी अर्बनच्या प्रमुख राजश्रीताई पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, अनुसयाताई खेडकर, महिला आघाडीच्या डॉ. निकिता चव्हाण, भुजंग पाटील, माधव पावडे, जयवंत कदम, गजानन कदम, सचिन किसवे, तुलजेश यादव यांच्यासह नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शिवसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अनिल देसाई यांनी शिवसेना पक्ष बळकटीकरणासाठी शिवसैनिकांनी काय केले पाहिजे याचा कानमंत्र दिला. ‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ या उपक्रमाने शिवसेनेची एकजूट वाढेल. अन्यायग्रस्त समाजाला न्याय देण्यासाठी शिवसेना हा एकमेव संघटना आहे जी की संकटावेळी धावून येते. विरोधी पक्षांकडून अनेक अडचणीचे फासे टाकल्या जात असले तरी शिवसेना कुठल्याही संकटाला घाबरणार नाही. शिवसैनिक निधड्या छातीचा निखारा असला पाहिजे तर आणि तरच आपल्या अंगावर कोणी येणार नाही, असे खासदार देसाई म्हणाले.

मुंबईत शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे सर्व जनतेला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावलेला तरुण युवा सेनेपासून शिवसेनेत काम करतो आहे. अन्याय सहन न करणारा व कुठे अन्याय होत असेल तर पेटून उठणारा आहे. या महाराष्ट्रातील शिवसैनिक अनेकांना माहिती आहे. शिवसेनेचे नाव या जगाच्या पाठीवर आजही मराठी माणूस ताठ मानेने घेतो आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, राजश्रीताई पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात नांदेड उत्तर व दक्षिण मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतचे सरपंचांनी आपल्या सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. सर्वांचे भगवी दस्ती देऊन अनिल देसाई यांनी स्वागत केले.

तीन दिवसीय दौरा, जिल्हाभरात कार्यक्रम

नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई हे तीन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेची बांधणी शिवसंपर्क अभियान, शासनाच्या योजनांची माहिती, तळागाळापर्यंत योजना पोहचताना येणाऱ्या अडचणी, यासंदर्भात शेतकरी, लाभार्थीशी चर्चा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या बिनबुडाच्या आरोपाला उत्तर तसेच शिवसेनावाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत त्यांचा हा दौरा आजपासून सुरू झाला आहे.

त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा, लोहा येथे लोहा-कंधार विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा, नरसी येथे नायगाव- देगलूर व मुखेड विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्याांचा मेळावा होणार आहे. तर २३ मार्च रोजी किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सकाळी अकरा वाजता गोपीकिशन मंगल कार्यालय, किनवट येथे होणार आहे. त्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील कार्यकत्यांचा मेळावा दुपारी तीन वाजता हदगाव येथे होणार आहे. तसेच भोकर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सायंकाळी सहा वाजता अर्धापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, शिवसेना खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर हे उपस्थित राहणार आहेत. खासदार अनिल देसाई २४ मार्च रोजी सकाळी विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!