ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ संत गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणल्यास आदर्श समाजाची निर्मिती -पेरे पाटील
◆ भास्कर पेरे पाटील यांच्याहस्ते बन्सीलाल कदम लिखित चरित्रग्रंथाचे प्रकाशन
नांदेड– स्वच्छतेचे देवदूत संत गाडगेबाबा यांचे कार्य व्यापक असून त्यांचे विचार आपण आचरणात आणले तरच चांगला समाज घडण्यास मदत होईल. यासाठी त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा या आदर्शगावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक बन्सीलाल कदम यांनी लिहिलेल्या व इसाप प्रकाशनाने सिद्ध केलेल्या ‘निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी व्ही.जे.एन. टी जनमोर्चाचे प्रदेश महासचिव बालाजीराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई पावडे, नगरसेवक बापूराव गजभारे, संपादक केशव घोणसे पाटील, विसावा ग्रुपचे अध्यक्ष गजानन मुधोळ पाटील व महाराष्ट्र डेबुजी फोर्सचे अध्यक्ष कैलास तेलंग यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी पेरे पाटील यांनी बन्सीलाल कदम यांच्या पुस्तकाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पेरे पाटील म्हणाले, गाडगेबाबा तुकाराम महाराज व माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे कार्य व्यापक होते म्हणून ते समाजाच्या लक्षात राहिले. जातीपुरते मर्यादित न राहता भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या, हा संतांचा विचार आपण विसरत चाललो आहोत. संत केवळ शासकीय योजनांना नाव देण्यापुरते व जयंती साजरी करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत काय, असा प्रश्नही त्यांनी केला. या महात्म्यांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले असून त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण केले पाहिजे. चांगल्या कृतीचे नेहमीच स्वागत केले पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आपण नेतृत्वाच्या कार्याकडे पहावे आणि तसा दृष्टिकोन बनावा यासाठी प्रयत्न करावे. समाजातील गरजवंतांना जे हवे ते देण्याचे काम आपण केले पाहिजे असे ते म्हणाले.
आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे पाटोदा या गावाला आदर्श ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून देणारे पेरे पाटील यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कराच्या संकलनातून मोठ्या प्रमाणात निधी जमवत त्याचा वापर आपण समाजाच्या प्रगतीसाठी कसा केला याचे अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाप प्रकाशनचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. थोरांची चरित्र बालवयात वाचल्यास चांगले नेतृत्व घडण्यास मदत होते. यासाठी पालकांनी मुलांना प्रवृत्त करावे असे ते म्हणाले.
लेखक बन्सीलाल कदम यांनी आपल्या लेखनाचे श्रेय बालाजी शिंदे व बालाजी इबितदार यांना असल्याचे सांगितले. लेखन करताना गाडगेबाबा जिथे वास्तव्यास होते तेथे जाऊन आपण माहितीचे संकलन केले. परीट बांधवांना गाडगेबाबांचे चरित्र अजूनही माहित नाही त्यामुळे त्यांचे विचार व लेखनाचा प्रसार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ‘देवदूत’ या कवितेच्या सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. अर्णव इबितदार याने गाडगेबाबांचे चरित्र काव्यातून मांडले. डॉ. शिवराज गंगावळ, डॉ. आशा पांडुरंग इबितवार यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप बालाजी शिंदे यांनी केला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बालाजी इबितदार यांनी केले.
हॉटेल विसावा पॅलेस येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम, देविदास फुलारी, मनोज बोरगावकर, डॉ. विठ्ठल पावडे, प्रा. कमलाकर चव्हाण, प्रा.मा.मा. जाधव, नागनाथ पाटील, नारायण शिंदे, अशोक कुबडे, प्रा बालाजी कोंपलवार, अमेय कदम, गंगाधर मावले, माधव नायके, दत्ता शिलेवाड, गंगाधर निम्मलवार, लालू कोंडलवाडे, योगेश आंबुलगेकर यांच्यासह सांगली येथून खास या कार्यक्रमासाठी आलेले बन्सीलाल कदम यांचे स्नेही, मित्र व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻