ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील बांधव मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या सोमवार, दि. ४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
सकल मराठा समाज नांदेडच्यावतीने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी हनुमान मंदिर मंगल कार्यालय, विजयनगर नांदेड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदरील बैठकीमध्ये सर्व सामाजिक संघटना व मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. बैठकीत सर्वांनुमते दिनांक ४ सप्टेंबर सोमवारी रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.
राज कॉर्नर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता पदयात्रेचे आयोजन केले आहे. सदरील पदयात्रा राज कॉर्नर, श्रीनगर, महात्मा फुले चौक (आय टी आय), शिवाजीनगर, कलामंदिर, एसपी ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत असेल. महाराजांच्या पुतळ्याजवळ ही पदयात्रा पोहचल्यावर छत्रपती शिवरायांना वंदन करून भजनी मंडळासोबत भजन गाऊन या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर बोलू न देण्याचा ठराव
विशेष म्हणजे उद्याच्या बंद मध्ये कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर बोलू न देण्याचा ठराव सकल मराठा समाजाने घेतला आहे .उद्याच्या नांदेड जिल्हा बंद मध्ये बालक, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी सर्व स्तरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातर्फे नांदेड जिल्हा पोलीस यंत्रणेला आवाहन करण्यात आले आहे की, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व संवैधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांचे योग्य ते संरक्षण करावे.
त्याचबरोबर सर्व व्यापाऱ्यांनी, शाळा,कॉलेज, कोचिंग क्लासेसने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सकलच्या बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद द्यावा, जेणेकरून कुठलाही अनुसूचित प्रकार घडणार नाही आणि शांततेने बंद यशस्वी होईल यासाठी सहकार्य करावे अशी विनंती सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. सदरील बैठकीत सकल मराठा समाजाचे असंख्य बांधव यावेळी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻