ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– पाकिस्तानमधील एका भारतविरोधी देशविघातक कृती करणाऱ्या व्हाट्सअप ग्रुपशी थेट संपर्क असलेल्या नरसी (जि. नांदेड) येथील एका तरुणास सुरत पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन गुजरातला नेले आहे. या प्रकरणामुळे येथे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नांदेड हे शहर चर्चेत आले आहे. सनातन संघटनेच्या नेत्यांसह पत्रकाराच्या हत्येचा कट या ग्रुपमध्ये रचण्यात येत होता, असे सांगण्यात आले.
दिनांक 12 मे रोजी 10 वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी (ता. नायगाव) येथील शेख शकील शेख सत्तार (वय 18 वर्षे) व्यवसाय शिक्षण (B.Sc.) यास सुरत शहर पोलिसांच्या एका पथकाने गु.र.नं. 11210015240039/2024 कलम 153-A, 467,468,471,120-B भा.दं.वि. सहकलम 66-D,67,67-A आय.टी.ॲक्ट या गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतले असून त्याला सुरतला नेण्यात आले आहे. जैशबाबा राजपूत नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप पाकिस्तानातील वकास व सरफराज डोगर हे चालवत होते. त्यामध्ये सुरत (गुजरात) येथील सोहेल टीमोल व बिहार येथील शहनाज हे सामील होते. सदर आरोपीतांनी मिळून सनातन संघाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी नेते आणि पत्रकार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन भडकावण्याचे प्रकार केले आहेत. परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या त्यांच्या चॅटिंग सुद्धा सापडल्या आहेत.
त्यानंतर सदर आरोपीचे व इतरांचे व्हॉट्सॲप ग्रुप मधील चॅटिंग तपासणी केल्यानंतर नरसी ता. नायगाव येथील युवक शेख शकील शेख सत्तार हा देखील यात सहभागी असल्याचे आढळून आले. रविवारी सुरत पोलिसांच्या पथकाने नांदेड पोलिसांना ही माहिती देऊन रामतीर्थ पोलिसांच्या मदतीने सदर युवकास अटक करून गुजरातकडे रवाना झाले आहेत. या संदर्भात सविस्तर चौकशीनंतरच सर्व बाबी पुढे येतील असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻