ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दक्षिण रेल्वे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसल्यामुळे संतापलेले नांदेडचे भाजप खासदार चिखलीकर येथे रेल्वे अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसल्याचे दिसून आले. आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाचा निमित्ताने आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर खासदारांची घसरलेली गाडी पाहून उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांची शिट्टी गुल झाल्याचा अनुभव यावेळी उपस्थितांनी घेतला.
आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय सूचना व प्रसारण विभागाच्यावतीने रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदारांना चहा पानासाठी रेल्वे स्थानकावरील विश्रामगृहात नेण्यात आले. यावेळी काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून खासदार चिखलीकर यांचा अचानक पारा चढला आणि त्यांनी काही रेल्वे अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तुमचे काही अधिकारी स्वतःला रेल्वेचे मालक समजतात काय? तुमच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. खासदार म्हणून आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी खेटे मारुन प्रश्नांची सोडवणूक करुन घेत असतो. पण नवीन रेल्वे मंजूर झाल्यानंतर किंवा त्या गाड्या सुरू करण्यापूर्वीची साधी पूर्वकल्पनाही खासदाराला दिली जात नाही. वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर आम्हाला या बाबी माहिती होतात. साधी कल्पना देण्याचे सौजन्य नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयातून का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना केला.
पण याचे समर्पक उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार चिखलीकरांनी, ‘सरकार आमचं आहे, अन मस्ती रेल्वे अधिकाऱ्यांची’ हे खपवून घेतले जाणार नाही, असा दमच भरला. आणि उपस्थित अधिकारी स्तब्ध होऊन एकमेकांना पाहत राहिले. आपण ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही कानावर घालणार असल्याचे खा. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. खासदारांची घसरलेली संबंधांची ही गाडी रेल्वे अधिकारी कशी ट्रॅकवर आणतात, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻