ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– 80 लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने असलेली सराफा व्यापाऱ्याची दागिन्यांची बॅग पळवण्यात आल्याची घटना नांदेडच्या सिडको भागात आज सकाळी घडली आहे. सराफा व्यापारी दुकान उघडताना हा प्रकार घडला असून ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली आहे.
सिडको परिसरातील गुरुकृपा ज्वेलर्ससमोर सकाळी दुकान उघडताना लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून 80 लाख रुपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिने असलेली ही बॅग पळवण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकान मालकाची नजर चुकवत डिक्की तोडून ही बॅग पळवली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको भागात असलेल्या गुरुकृपा ज्वेलर्स समोर आलेल्या सराफा व्यापाऱ्यावर तसेच त्यांच्या दुचाकीवर पाळत ठेवून एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीची डिक्की फोडून अवघ्या दोन मिनिटांच्या आत वरील बॅग लंपास केली आणि पोबारा केला. दुकानदारांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी वरिष्ठाला ही माहिती देऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळ गाठले. सिडको परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻