Tuesday, December 3, 2024

सलग तिसऱ्या वर्षी मांजरा धरण १०० टक्के भरले, धरणाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ निम्न तेरणा, तावरजा मध्यम प्रकल्पाचेही दरवाजे उघडले

◆ लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही जोरदार पाऊस सुरु; शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान

लातूर– लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मांजरा धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. द्वार क्र. १ आणि द्वार क्र. ६ हे २५ सेंटीमीटर उंचीवर उघडण्यात आले आहेत. मांजरा नदी पात्रात १७४७.३३ क्युसेक ( ४९. ४८ क्युमेक्स ) इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे मांजरा नदी काठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे. कालवालगतच्या गावचे ग्रामस्थ, नागरिकांनी कॅनॉलमध्ये उतरू नये, पशुधन जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

गेल्या वर्षी २२ सप्टेंबर २०२१ रोजी मांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. सलग तिसऱ्या वर्षी मांजरा धरण पूर्णपणे भरले आहे. यावर्षी पुन्हा एकदा परतीचा जोरदार पाऊस झाल्याने मांजरा धरण १०० टक्के भरल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक बघूनच विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे.

दरम्यान मांजरा धरण १०० टक्के भरल्यामुळे लातूर शहरासह उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज या शहरांसहित अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या सीमेवर केज तालुक्यातील धनेगाव इथे हे धरण आहे. २२४ दशलक्ष घनमीटर इतकी या धरणाची क्षमता आहे. उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचा येवा अजूनही धरणात सुरु आहे. दरम्यान धरण भरल्यानंतरही लातूर शहराला ०८ दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे लातूर महापालिकेने आता तरी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम करून ०८ दिवसाएवजी ०२ ते ०३ दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पही १०० टक्के भरल्यामुळे धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच औसा तालुक्यातील याशिवाय तावरजा मध्यम प्रकल्पाचेही ०२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील इतरही मध्यम / लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अनेक नद्या, ओढे-नाले, तलाव हे भरभरून वाहू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अद्यापही पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!