ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या असर्जन शिवारामध्ये एका जमिनीचा विकास कामात बनावट कागदपत्रे तयार करून अडथळा निर्माण करून बांधकाम व्यावसायिकाकडून चक्क सव्वाकोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका वकिलासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजाराम येवले (राहणार जानापुरी) याला अटक केली आहे.
शहराच्या विसावा नगर भागात राहणारे शिरीष बाबुलाल कासलीवाल (वय 55) यांची नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीतील विसर्जन शिवारात शेती आहे. त्या शेतावर प्लॉटिंग टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत दाखल।करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दि. 5 आक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2021 दरम्यान राजाराम मारोतराव येवले (राहणार जानापुरी), संजय रंगनाथ कदम (राहणार सोनखेड), आनंदा अमृता येवले (राहणार बामणी), दत्ता आनंदराव सूर्यवंशी (राहणार दगडगाव), मोहन नारायण ढवळे (राहणार दगडगाव) आणि नांदेड जिल्हा सत्र न्यायालयातील नोटरी करणारे एडवोकेट आर. के. टोम्पे यांनी संगणमत करून कट रचून शिरीष कासलीवाल यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन बनावट सौदाचिठ्ठी तयार केली. विशेष म्हणजे, एफआयआरनुसार जमिनीच्या विकास कामात अडथळा आणून वेळोवेळी शिरीष कासलीवाल यांना वरील आरोपींनी ब्लॅकमेल केले. एवढेच नाही तर वरील काळात तब्बल एक कोटी २० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
या प्रकरणी शिरीष कासलीवाल यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471, 474, 384, 385 आणि 120 ( ब) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे संबंधात असल्याने पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हा तपास नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरसेवार यांनी आरोपी राजाराम मारोतराव येवले याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय आरसेवा करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻