ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठासमोर आंदोलन
नांदेड– येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दि. २१ जून एैवजी आता २८ जून पासून परीक्षा सुरू होणार आहेत. आज सकाळीच विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गतपदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २१ जून २०२२ पासून सुरू होणार होत्या. सदर परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २८ जून २०२२ पासून सुरू होणार आहेत.
या बाबतचे विस्तृत वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थांच्या विनंतीवरून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश काढला आहे. पण विद्यापीठाच्या २ जून २०२२ पासून सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा या प्रचलित पेन अँड पेपर पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिकाद्वारे घेण्यात येणार आहेत. या बाबतीत प्राचार्य, परीक्षा केंद्रप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्व घटकांनी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे उन्हाळी-२०२२ च्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठासमोर आंदोलन
दरम्यान, सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात व प्रत्येक पेपरमध्ये किमान दोन दिवसांचा अंतर द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम व एनएसयुआयचे ज़िल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
बहुतांश महाविद्यालयामध्ये शिकवणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे, अभ्यासक्रम पूर्ण झालेले नसल्यामुळे तसेच सराव परीक्षा सुद्धा मागील एक, दोन दिवसांपूर्वी झाल्या आहेत. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून परीक्षा या MCQ पद्धतीने घेतल्या गेल्या. यावेळी परीक्षा कशापद्धतीने होतील हे विद्यार्थ्यांना खूप उशिरा समजले. त्यामुळे वेळेवर परीक्षाची तयारी झालेली नाही. अभ्यासक्रम सुद्धा online पद्धतीने शिकवला गेला व परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थी मानसिक ताणातून जात असल्याचे या संघटनांचे म्हणणे होते.
त्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करणासाठी वेळ द्यावा व परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्या, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. तसेच कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यानंतर कुलगुरूंनी मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य करत आज रात्रीपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोटीस काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
या आंदोलनात प्रतीक देमनगुंडे, फैसल सिदिकि, निखिल वाघोळे, अझीम शेख, प्रसाद पवार, महेश देवसरकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻