ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शारदानगर भागात हत्या झालेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या घरी निनावी पत्र आले असून यात हत्येबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणारा उल्लेख आहे. पत्र पाठविणाऱ्याने यावर आपल्या नावाचा कसलाही उल्लेख केलेला नसून निनावी पत्र पाठविले आहे. या पत्रात लिहिलेल्या मजकुराच्या सत्य- असत्यतेची पोलीस पडताळणी करीत आहेत.
आठवडाभरा पूर्वी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अनोळखी मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. ह्या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह राज्यभर खळबळ माजली होती. ह्या घटनेला आठ दिवस उलटले असून अजून हल्लेखोर सापडलेले नाहीत, अशातच आज मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या या पत्रात, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, यासह इतरही काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वरकरणी दिसत आहे. तारखेच्या ठिकाणी अस्पष्ट पद्धतीने तारीख लिहिलेली आहे.
हत्येबाबत माहिती देण्याचा आशय असणारे हे निनावी पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकले. हत्येनंतर भयभीत असणारे बियाणी कुटुंबीय या पत्रामुळे आणखी अस्वस्थ झाले आहेत. सध्या नांदेड पोलिसांचा बियाणी यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या पत्राद्वारे संजय बियाणी यांच्या हत्येबाबत काही माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे? की पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक हे पत्र पाठवले आहे? अशा सर्वच बाजुंनी आता पोलिसांना तपास करावा लागत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻