ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- कंधार येथील प्रसिद्ध हाजी सैया सवरे मगदूम (बडी दर्गा) चे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कंधारच्या जगतुंग तलावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
पाचही मृतदेह बाहेर काढून कंधारच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, पोलीस निरीक्षक इंद्राळे यांच्यासह मयतांच्या नातेवाईकांनी धाव घेतली आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.
नांदेड शहराच्या इक्बालनगर/ खुदबईनगर परिसरात राहणारे मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफार (वय ४५) हे आपल्या कुटुंबियांसह (एमएच२६- बीडी- ४५३५) या ऑटोमधून कंधारला दर्शनासाठी गेले होते. तेथील प्रसिद्ध हाजी सैया सरवरे मगदूम (बडी दर्गा) चे दर्शन झाल्यानंतर नवरंगपुरा भागातील एका शाळेच्या आवारात त्यांनी जेवण केले. जेवल्यानंतर ताट धुण्यासाठी त्यांचा एक मुलगा जगतुंग तलावात उतरला. त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा असे एकापाठोपाठ एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महिला नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. काही तरुणांनी तलावात उड्या मारून शोधाशोध करून अखेर पाचही मृतदेह बाहेर काढले.
नांदेडच्या एकबालनगर भागातील एकाच कुटुंबातील हे सदस्य असल्याचे लक्षात आले. मयतांमध्ये मोहम्मद विखार (वय 23), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (वय २०), सय्यद नावेद सय्यद वाहिद (वय 15), मोहम्मद साद मोहम्मद शफीऊद्दीन (वय15) आणि मोहम्मद शफीउदिन मोहम्मद गफार (वय ४५) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून कंधार पोलिसांनी हे पाचही मृतदेह कंधारच्या रुग्णालयात दाखल केले आहेत. या घटनेमुळे नांदेड शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻