ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड- नुकतेच सेवानिवृत्त झालेले लेखापाल विनायक फुटाणे यांना हॅकरनी सहा लाखांचा गंडा घातला आहे. लिंकची माहिती विचारून त्यांच्या खात्यातून धडाधड ही रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. नऊ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळकृष्णनगर भागात राहणारे विनायक फुटाणे हे नुकतेच लेखापाल या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या खात्यावर 14 लाख रुपये रक्कम होती. या संधीचा फायदा अज्ञात हॅकरनी घेतला. हॅकरनी नऊ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्यात लिंकमध्ये आपला युजर आयडी, पासवर्ड, मोबाईल क्रमांक, एटीएम क्रमांक आणि सीव्हीसी क्रमांक सर्वकाही भरून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. बँकेतून मेसेज मिळाल्याने विनायक फुटाणे यांनी ती लिंक सर्व माहितीनुसार भरली आणि अपलोड केली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात त्यांच्या खात्यातून एक लाख पन्नास हजार 999, 24 हजार 999, दोन लाख 14 हजार 780 आणि 99 हजार 999 असे एकूण पाच लाख 89 हजार 777 रुपये हॅकरनी आपल्या खात्यात वर्ग करून घेतली.
बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज धडाधड येताच विनायक फुटाणे एकदम गोंधळून गेले. लगेच त्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर बँकेने मात्र सावध पवित्रा घेत उरलेली रक्कम हॅकरच्या खात्यात जाऊ दिली नाही. नसता विनायक फुटाणे यांना 14 लाखाचा गंडा बसला असता. अखेर या प्रकरणी विनायक फुटाणे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली हॅकरविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स्वतः श्री आडे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻