ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– हेल्मेट सक्ती सरसकट सर्वांना आणि सर्वत्र नाही तर ती केवळ शासकीय कार्यालयात येतानाच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हेल्मेट सक्ती वरून नांदेडकरांमध्ये एकच चलबिचल सुरू झालेली असताना आणि काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासनाने ही स्पष्टोक्ती दिली आहे.
शासकीय कार्यालयात येताना मात्र कार्यालयीन कामासाठी येणारे नागरिक व त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी विना हेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.पआका/हेल्मेट तपासणी / अंमल-2/का-2अ(12)/2021/जा.क्र.3385 यांचे दिनांक 22.03.2022 रोजीचे पत्र आणि जिल्हाधिकारी, नांदेड यांचे परिपत्रक जा.क्र. सीआर-१२/ रस्ता सुरक्षा/हेल्मेट परिपत्रक / नांदेड / २०२२ यांचे दिनांक ३०.०३.२०२२ रोजीचे पत्र, या दोन्ही पत्रांना अनुसरून एक नवीन पत्र जारी करण्यात आले आहे.
नव्याने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी, नांदेड यांचे संदर्भ क्र.2 अन्वये दिनांक 30.3.2022 रोजीच्या परिपत्रका अन्वये शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिक / कर्मचारी / अधिकारी यांनी दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करण्याबाबतचे निर्देश दिलेले होते. परंतु सर्व दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करण्याची सक्ती करण्यात आली असल्याचा समज झाल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे या प्रसिध्दीपत्रकाद्वारे असे सूचित करण्यात येते की, फक्त शासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन कामासाठी येणारे नागरिक व त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी विना हेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास मोटार वाहन अधिनिय नुसार कारवाई होणार आहे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनीही केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻