Saturday, November 23, 2024

३० वर्षे आमदार, एक वेळा खासदार: मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत गौरव

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

डॉ.केशवराव धोंडगे यांच्याकडून कष्टकरी, कामगारांसाठी आयुष्य समर्पित –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. डॉ.केशवराव धोंडगे यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेले, नांदेड जिल्ह्यातील कंधारचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अजित पवार सर्वश्री सदस्य बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गऊळ गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी १९४८ मध्ये श्री. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधार मधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री. धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.

नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे श्री. धोंडगे यांनी दाखवून दिले आहे. श्री. धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली. सन १९९१ पासून येथे दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श्री. धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. ‘जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. त्यांनी आजतागायत सुमारे ३० पुस्तकाचे लेखन केले आहे.

‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’, ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार’, ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’, ‘भारतीय विकास रत्न अॅवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासामध्ये डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांचे योगदान मोठे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या डॅा. भाई केशवरावजी धोंडगे यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम केले आहे. दांडगा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी, साहित्याचे जाणकार, अभ्यासू लेखक आणि व्यासंगी पत्रकार असलेल्या धोंडगे यांचे कार्य, योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत काढले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव उपसभापती डॅा. नीलम गो-हे यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने एकमताने संमत केला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सभागृहात भाई बोलायला लागले की विरोधी पक्षानेही कान टवकारून ऐकावे असे त्यांचे सभागृहातील निवेदन असे. जातीपातीच्या जोखडातून समाज मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आहेत. अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबडया समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. छत्रपतींचा राष्ट्राभिमान, मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह, महात्मा गांधींची निःस्वार्थ, निरपेक्ष सेवावृत्ती, लोकमान्यांचा कर्मयोग आणि कर्मयोगावर आधारलेली समाजरचना घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.  उपेक्षित समाजाला जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. 

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांनी 1957, 1962, 1967, 1972, 1985, 1990 अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या. एक अभ्यासू आणि लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर 1975 च्या आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत दिल्लीतही आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखविली, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे अभ्यासक असलेल्या श्री.धोंडगे यांनी मुक्ताईसुत या नावाने विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ते सातत्याने जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. १९५७ ते १९९५ अशा दहा निवडणुका आणि ११ मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी ४० पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी भाषणे, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरत भल्याभल्यांची भंबेरी उडवली, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

या प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, एकनाथ खडसे, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. केशवराव धोंडगे यांनी विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली -विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार
 
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.केशवराव धोंडगे यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्र विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. नार्वेकर बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले,  डॉ. धोंडगे यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलने केली. सन १९५७ ते १९९० दरम्यान पाच वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. सन १९७७ मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले. एक अभ्यासू लोकप्रतिनधी म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे.

डॉ. धोंडगे यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले, मुली शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालत आहेत, असे श्री. नार्वेकर यांनी नमूद केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!