ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे तोंडावर बोट
नांदेड (प्रल्हाद कांबळे)– जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत भोपाळ येथील कंपनीमध्ये नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या “102” या रुग्णवाहिकेच्या चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी व कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसला असून याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एकता आरोग्यसेवा रुग्णवाहिका वाहन चालक वेल्फेअर असोसिएशन संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात प्राथमिक रुग्णालय आणि तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत “१०२” रुग्णवाहिका वाहन चालक कार्यरत आहेत. जिल्ह्यात ८२ रुग्णवाहिकावर ८२ चालक कार्यरत असून त्यातील ६५ चालक हे अश्कोम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भोपाळ या कंपनी मार्फत तर दहा चालक गणराज कंपनी आणि उर्वरित चालक आरकेएस या कंपनीमार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत सेवा देतात.
रुग्ण कल्याण समिती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत या रुग्णवाहिका जिल्हाभरात रुग्णांची व औषधांची तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांची ने- आन करतात. मागील तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना कंपनीने वाऱ्यावर सोडले असून त्यांना अद्याप पगार देण्यात आला नाही. तुटपुंज्या वेतनावर काम करणारे हे चालक मागील तीन महिन्यापासून कर्जबाजारी झाले आहेत. त्यांचा मागील तीन महिन्याचा थकीत वेतन अदा करण्यात यावे, कोविड काळात काम केलेल्या अतिरिक्त कामाचा भत्ता देण्यात यावा तसेच राज्यात कार्यरत असलेल्या अश्कोम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोपाल यांचे टेंडर संपुष्टात आल्यानंतर यापुढील नियुक्तीही सध्या कार्यरत असलेल्या वाहनचालकांना कोणत्याही कंपनीमार्फत न देता आपल्या स्तरावरून यांची नियुक्ती करण्यात यावी, ओवर टाइम भत्ता देण्यात यावा, दिवाळी बोनस मागील अडीच वर्षापासून मिळाले नाही ते देण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी जवळपास ८२ चालकांनी जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही त्यांना मदत न करता आमच्या मार्फत तुमच्या सेवा नाही तुम्ही कंपनीलाच भांडा असा सल्ला दिला. त्यामुळे एकीकडे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संपर्कात येत नाहीत व ज्यांच्याकडे काम करतो तेही हात वर करतात मग आम्ही चालकांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल या चालकांनी केला आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून चालकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने शेख कादर, सतीश कांबळे, नीळकंठ कांबळे, वैभव नरंगलकर आणि आदींनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻