ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
खेळ संस्कृतीचे जतन करण्यासाठी महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या चार राज्यातील ५६ संघांचा सहभाग
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या माध्यमातून खेळ संस्कृतीचे जतन होईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन दि. २७ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाने विविध समितीचे गठन करून खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या चार राज्यातील ५६ संघाचा सहभाग राहणार आहे. स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आलेली असून त्यासाठी विविध समित्या कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. स्पर्धा विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये मॅटवर प्लड लाईट सुविधेत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी स्पर्धेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या स्पर्धेत कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला खेळाडूंचा सहभाग राहील. कोरोनाचे नियम पाळून स्पर्धा यशस्वी केल्या जातील. या स्पर्धा खिलाडूवृत्तीने व पारदर्शकपणे यशस्वी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मुलींच्या स्पर्धा असल्याने विद्यापीठ अंतर्गत असलेल्या जिल्ह्यात स्पर्धेचे महत्त्व व सहभाग वाढविणे हा व्यापक उद्देश आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून स्पर्धा यशस्वी होतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केला.
प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्पर्धेसाठी ६७२ खेळाडू ११२ मार्गदर्शक व व्यवस्थापक येत असून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था विद्यापीठ मोफत करणार असल्याचे सांगितले. तसेच थंडीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेपूर्वी व स्पर्धेच्या नंतर दररोज दोन वेळा खेळाडूसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्याचे संघ येत असल्याने खेळाडूच्या कुटुंब, नातेवाईक, विद्यापीठ व महाविद्यालयास या स्पर्धेचा आनंद घेता यावा म्हणून विद्यापीठ स्थरावरून युट्युबवर स्पर्धा लाईव्हची सुविधा करण्यात आली आहे. तसेच खेळाडूला दररोजच्या स्पर्धेचे वार्तांकन वाचन करण्यासाठी विविध दैनिकांचा स्टॉल उपलब्ध केला जाणार आहे. अशी माहिती यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन दि. २७ डिसेंबर२०२१ रोजी दु. 3:०० वा. होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ दि.३० डिसेंबर २०२१ रोजी दु ४:०० वा. करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, डी.एम.आर. द.म. नांदेड विभागाचे उपेंद्रसिंग, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व अर्जुन पुरस्कार प्राप्त राजू भावसार व छत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गणेश शेट्टी यांची उपस्थिती राहणार आहे.
व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेचे प्रस्ताविक विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार यांनी केले. या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्रो.डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. बळीराम लाड आदीसह विविध दैनिक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻