ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- रंग आणि रेषांचे अफलातून संमिलन घडविणारे आणि आपल्या जादुई कुंचल्याच्या विविधरंगी, विविधांगी फटकाऱ्यांतून मानवी मनाच्या खोल तळात विचारकल्लोळ निर्माण करणारे विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचा ‘चंद्रमोहनगप्पा‘ हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत नांदेड येथील प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट आणि अक्षर परिवार यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर आणि सुचिता खल्लाळ हे चंद्रमोहन यांची मुलाखत घणार आहेत. महाराष्ट्राच्या, देशाच्या चित्र-शिल्पविश्वात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या चंद्रमोहन यांची चित्रकृती अथवा शिल्पकृती प्रत्येकवेळी लक्षवेधी असते. मानवी भावना, समाज, देश, घटना या साऱ्या गोष्टींची वेगवेगळी स्पंदनं टिपण्याची आणि त्यातील नेमकेपणा उजागर करण्याची दैवी कला चंद्रमोहन यांच्या हातात आहे.आपला भवताल, वर्तमान आपण सारेच पाहत असतो; पण चंद्रमोहन यांच्या दृष्टीत तो चित्र-शिल्प रूपाने सामावतो. चित्रकलेला जशी हजारो वर्षांची परंपरा आहे, तसे प्रत्येक कालखंडात ती पुढे पुढे जात राहते; पण इतिहासातल्याच चित्रांना नव्याने साज चढविण्याची बऱ्याचदा अनेक चित्रकारांची कलात्मकता खर्ची पडते. पण यातून चित्रपरंपरेला वर्तमानकाळातला ठेवा तितकासा जमा होत नाही. पण चित्रकलेतला पुढे इतिहास होईल असा ठेवा चंद्रमोहन यांनी निर्माण केला आहे. किंबहुना ते या वर्तमानात चित्रयुगाचे प्रतिनिधी आहेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो की, कामयाबी शोर मचा दे’ या उक्तीनुसार चंद्रमोहन कुठलाही गाजावाजा न करता आपल्या चित्रातून वैश्विकतेला गवसणी घालतात.जलरंग, पारदर्शक रंगाच्या वॉटरप्रुफ इंक्स, पोस्टर कलर्स या सर्व माध्यमातून इलस्टेटर म्हणून त्यांची हुकुमत आहे. मराठीसह अन्य भाषांतील पुस्तकांची अक्षरशः हजारो मुखपृष्ठ त्यांनी साकारली आहेत. घट्ट रंगांवर पातळ आणि पारदर्शी रंगांचे ओघळ किंवा पलो सोडून त्यातून अर्थवाही चित्र करणं, हे चित्र दुनियेत अत्यंत अवघड काम आहे; पण त्यात चंद्रमोहन यांची मास्टरी आहे.वैचारिक आणि कलात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर चंद्रमोहन यांची कमांड आहे.
मानवी जीवनाकडे आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा एक विविध छटांचा दृष्टीकोन त्यांच्या चित्रातून ओघळत राहतो.रसिकांच्या मनात, कागदावर आणि कॅनव्हॉसवर रेखाटनं करणाऱ्या चंद्रमोहन यांचा चित्रप्रवास ऐकणं आणि पाहण्यासाठी या प्रत्यक्ष मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक साहित्यिक व्यंकटेश चौधरी आणि प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष बालासाहेब माधसवाड यांनी केले आहे.सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रियदर्शिनी विद्यासंकुल प्रांगण, विमानतळ रोड, एमजीएमसमोर, नांदेड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻