ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ पान टपरी टाकण्यासाठी पैसे देत नसल्याने खून केल्याचे उघड
नांदेड– किरकोळ कारणावरून विशाल रमेश धुमाळ ( वय २२) याचा खून करणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी काही तासातच अटक केली. मारेकरी अक्षय हळदे हा विशाल धुमाळ याला अपघातानंतर पैसे मागत होता. याच कारणावरून त्याने मित्रांची मदत घेऊन धुमाळ याचा खून केला असल्याची बाब उघडकीस आली आहे.
शनि (पार्डी) तालुका अर्धापूर येथील विशाल रमेश धुमाळ हा अक्षय ऊर्फ माधव आनंद हळदे (राहणार शिवनगर, नांदेड) याचा मित्र होता. या मित्रत्वाच्या नात्याने हे दोघेजण दुचाकीवरून काही दिवसांपूर्वी हदगाव ला दत्ता बापू देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते. परत येताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने अक्षय त्याच्या हाताला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून विशालला तो पान टपरी टाकण्यासाठी वीस हजार रुपये मागत होता. यातूनच त्यांचे वाद विकोपाला गेले. आणि अक्षय हळदे याने आपला मित्र विनायक तुकाराम सोनटक्के (राहणार डी-मार्ट जवळ, नांदेड) आणि शुभम दिगंबर सोनगांवकर (राहणार मालेगाव तालुका अर्धापूर) यांची मदत घेऊन काल दि.५ जानेवारीच्या रात्री आठच्या सुमारास विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शारदानगर परिसरात असलेल्या रेसिडेन्सी अपार्टमेंट समोर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही चोरट्यांना पूर्णा येथून अटक केली. पान टपरी टाकण्यासाठी वीस हजार रुपये अक्षय हळदे हा मयत विशाल धुमाळ याला मागत होता, तो पैसे देत नसल्याने आम्ही त्याचा खून केल्याची कबुली अक्षय हळदे यांनी पोलिसांना दिली. आज सायंकाळी या तिघांनाही न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे ननावरे यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻