ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● जवान भाग्यनगर पोलिसांच्या कोठडीत
नांदेड- एका फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणात अटकेच्या भीतीने मुदखेडमध्ये निमलष्करी दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सदर जवानाला आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाग्यनगर पोलिसांच्या दप्तरी गंभीर गुन्हा दाखल असलेला निमलष्करी दलातील जवान याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासोबतच त्याने हुज्जत घालून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्या दुसऱ्या एका साथीदाराने पोलीस पथकाशी हुज्जत घातली. याप्रकरणी जवान दत्ता बीडकलवार याला भाग्यनगर पोलिसांनी अटक करून आणले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत ( दि. १०) पोलीस कोठडीत पाठवले आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या दप्तरी कलम 384, 386, 506 भादविसह कलम 67 आयटी ॲक्टमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम भाग्यनगर पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे यांनी सुरू केली. त्यांना पाहिजे असलेला एसएसबी दलात सशस्त्र सुरक्षा बल बलाढीपण 42 निवाडा उत्तर प्रदेश येथे कार्यरत असलेल्या दत्ता गोविंद बीडकलवार (वय 31) हा मुदखेडच्या कृष्णानगर येथे आल्याची माहिती एपीआय सुशांत किनगे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दि. 6 जानेवारीच्या रात्री पावणेअकराच्या सुमारास कृष्णानगर गाठले. यावेळी दत्ता गोविंद बीडकलवार यांना पोलिसांचे ओळखपत्र दाखवून आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला आमच्या वरिष्ठ साहेबांनी बोलावले आहे असे म्हणताच अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्याने हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्यानंतर काही वेळातच त्याने स्वेटरच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तसेच आपल्यावर कोणता गुन्हा नाही मग मला का घेऊन जाता? असे म्हणून गोविंद गंगाधर बीडकलवार (वय 52) याने पोलिसांशी झटापट करुन त्यांना ढकलून दिले. या दोघांनी संगनमत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मात्र या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
यापैकी गोविंद बिडकलवारला मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन केले, तर दत्ता बीडकलवार यांना भाग्यनगर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन नांदेडला आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. दहा जानेवारी ) पोलीस कोठडीत पाठवले आहे. या दोघांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गीते करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻