ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● यात्रेनिमित्त सात दिवस पार पडले विविध कार्यक्रम
● लोककला व लावणी महोत्सवात परिसरातील रसिकांची गर्दी
नांदेड/ नायगाव बाजार- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर गावोगावी पुन्हा विविध यात्रांचा उत्साह दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या रातोळी येथेही रोकडेश्वर यात्रा महोत्सवाने हे गाव फुलले होते.
रातोळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री. रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त सात दिवस हरिनाम सप्ताह, किर्तन, नयनरम्य आतिषबाजी, पशुप्रदर्शन, जंगी कुस्त्यांचा फड , मनोरंजनात्मक कार्यक्रम या कार्यक्रमाबरोबरच रातोळी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
रातोळी येथे श्री. रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमीत्त समस्त गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला जातो. यावर्षीही कला संस्कृतीची योग्य शिकवण देणाऱ्या विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. १८ रोजी लोककला व लावणी महोत्सवाचे उद्घाटन कै. गणेश वनसागरे लोककला मंचावर करण्यात आले. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, बक्षीस, शाल व श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले.
यात नामांकित कलाकार , बालकलाकार , टिकटॉकमधील लावणी सम्राज्ञी किरण कोरे यासह गिरी संच नायगाव, संतोष चव्हाण, अमोल जावदेकर, स्वरांजली जोंधळे , सोनाली भेदेकर, विद्या नांदेडकर, आरोही डोंगरे, माहेश्वरी स्वामी, दिपाली मेहरकर, सोनाली पुणेकर, गणेश काकडे संच नांदेड यासह विविध कलाकारांनी भाग घेवून महाराष्ट्रातील गोंधळी, लावणी, हिंदी व देशभक्तीपर गीत , जुगलबंदी आदी विविध प्रकार सादर करून येथील रसिक- श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
नांदेड जिल्हयातील प्रसिद्ध असलेल्या रातोळी येथील अनेक भक्ताचे श्रध्दास्थान व नवसाला पावणाऱ्या श्री. रोकडेश्वर महाराज यात्रेनिमीत्त भरगच्च तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच पारंपारिक लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. यामुळे रातोळी नगरी फुलली होती. यावेळी कला महोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील रसिक- श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी रातोळी व समस्त रातोळीकरांनी परिश्रम घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻