ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– निळा (ता. नांदेड) वसमत रस्त्यावर असलेल्या पावडे पेट्रोल पंपावर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कामगारांना पिस्तुलचा धाक दाखवून एकवीस हजार रुपये लुटल्याची घटना दि. 22 फेब्रुवारीच्या दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निळा वसमत रस्त्यावर वैशाली पावडे यांचा पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपवर 22 फेब्रुवारीच्या दुपारी चारच्या सुमारास एका विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरून दोघेजण पेट्रोल टाकण्याच्या निमित्ताने आले. गाडीत दोनशे रुपयाचे पेट्रोल टाक असे पेट्रोल पंपावरील कामगाराला सांगितले. गाडीत पेट्रोल टाकले तेव्हा त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पेट्रोल टाकणाऱ्याचा हात पीरगळला व दुसऱ्याने पिस्तुलासारखे दिसणारे हत्यार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. मारुती काळे यांच्या हातातील पेट्रोल विक्रीतून आलेले आठ हजार रुपये तसेच बाजूला उभा त्याचा सहकारी मुंजाजी कदम याच्या जवळील तेरा हजार रुपये अशी एकूण २१ हजार रुपये रोख रक्कम या दुचाकीवरील चोरट्यांनी जबरीने काढून घेतले व नांदेडच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून कामगारांनी घडलेला प्रकार तात्काळ पेट्रोलपंप मालकाला सांगितला. यानंतर पेट्रोलपंप मालक यांनी आपल्या पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. कर्मचार्यांना सोबत घेऊन त्यांनी लिंबगाव पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार गंभीर असल्याने लिंबगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. चोरट्यांचा माग सुरू असून मारोती प्रभाकर काळे यांच्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार करत आहेत.
दोन दिवसापूर्वीच हिमायतनगरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर तीन हजार लिटर डिझेलची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हा दुसरा प्रकार निळा येथील पेट्रोल पंपावर घडला आहे. यामुळे पेट्रोलपंप चालक धास्तावले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻