ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– कोवीड-19 महामारी दरम्यान आपले कर्तव्य पार पाडत असताना नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस पाटील यांचा मृत्यु झाला होता. दिवंगत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 50 लाख रुपये असे दोघांना मिळून एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कोरोना महामारी फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने नियुक्त केलेले पोलीस पाटील यांनाही कोरोनाचा फटका बसला. जिल्ह्यात कोरोनामध्ये बापुराव महाजन बलतंडवार रा. जोशी सांगवी ता. लोहा जि. नांदेड आणि गंगाधर व्यंकटराव इंगळे, रा. इब्राहिमपुर, ता. देगलुर, जि. नांदेड यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना काळात सतत काम करीत असतांना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सदर पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजुर होण्याकरीता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवुन सातत्याने पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वरील दोन्ही पोलीस पाटलांच्या कुटुंबियाना प्रत्येकी पन्नास लाख रूपये इतकी रक्कम सानुग्रह सहाय्य म्हणून मंजुर करणे बाबत पोलीस महासंचालक कार्यालयास कळविले असता पोलीस महासंचालक यांनी शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी स्वतंत्र आदेश निर्गमीत केले आहेत. मंजूर झालेली रक्कम लवकरच दिवंगत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻