Saturday, December 21, 2024

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी- नागरिकांशी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

एकूण 30 विद्यार्थी अडकले

नांदेड– युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थी व इतर नागरिकांशी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला. नांदेड जिल्ह्यातील एकूण 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तिथे फसलेले सर्वच नागरिक लवकरात लवकर सुखरूप मायदेशी परत यावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात महाराष्ट्रातील काही नागरिकांसमवेत विद्यार्थीही अडकून पडले आहेत. यात नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले तब्बल 30 विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील किव्हमध्ये विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतला आहे. या आठवड्याच्या प्रारंभी रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर आणि युक्रेनवर विशेषत: किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर स्वाभाविकच तेथील महाराष्ट्रयीन, विद्यार्थी हे भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती ओढावली आहे त्याची हकीकत आपल्या बोलण्यातून सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक जी काही मदत आहे ती पोहचण्याबाबत मी स्वत: संपर्क साधून आपल्याला सुखरूप भारतात कसे परता येईल याबाबत प्रयत्नरत असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही केंद्र सरकारला एक स्वतंत्र मदतीचे पत्र तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक दिले असून तेही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!