ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका मुलीसोबत ‘जीवनसाथी’ या वेबसाइटवरून ओळख करून घेऊन पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला नांदेड पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या भामट्याने 50 हुन अधिक मुलींना फसवल्याची कबुली दिली असून त्याच्यावर आठ गुन्हे दाखल असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मूळच्या मुंबई येथील व सध्या नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका नोकरदार महिलेला जीवनसाथी वेबसाईटवर ओळख करून फसवण्यात आले. आपली बनावट प्रोफाइल तयार करून सदर मुलीशी लगट साधण्याचा प्रयत्न आरोपीने केला. सदर मुलीचे या वेबसाईटवर असलेले प्रोफाइल पाहून ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान भामटा आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ नहुश म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे (राहणार मुंबई) याने तिच्याशी संपर्क साधला. मी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अर्थात इस्रोमध्ये इंजिनिअर पदावर असल्याचे त्याने मुलीला सांगितले. तिचा विश्वास संपादन करत तिला आपल्या जाळ्यात ओढले.
हा उच्चशिक्षित भामटा अनेक नोकरदार तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतो आणि मग फसवतो असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याने आत्तापर्यंत 50 हून अधिक मुलींना गंडविल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्याविरुद्ध नांदेडसह राज्यातील विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यानच्या काळात वेबसाईटवर आपला फोटो नाही असे पीडित मुलीने त्याला विचारले असता तो म्हणाला की, मी इस्त्रोसारख्या मोठ्या कंपनीत इंजिनिअर असल्याने मला फोटो टाकता येत नाही. त्याने आपला फोटो सदर मुलीच्या व्हाट्सअपवर टाकून चॅटिंग सुरू केली. तिला विश्वासात घेऊन मला पुढे अमेरिकेत पीएचडी करावयाची आहे. लवकरच माझे प्रमोशन आहे, त्यासाठी पाच लाख रुपयाची गरज असे सांगत पीडित मुलीकडून स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड शाखेतून पाच लाख 15 हजार रुपये उकळले. या मुलीने त्याच्या खात्यावर हे पैसे वर्ग केले.
त्यानंतर सदर मुलगी लग्नासाठी घाई करू लागतात तो तिला उडवाउडवीचे उत्तरे देत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आदर्श प्रशांत म्हात्रे या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेत पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाला मुंबईला पाठवले. मुंबई सायबर सेलचा मदत घेत पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली.
आरोपीला नांदेड येथे आणल्यानंतर शुक्रवारी दि. 4 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत म्हणजेच 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपसाबद्दल कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻