ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मातोश्री वृद्धाश्रमातील अनोखा ‘रंगपंचमी’ उत्सव
लातूर– लातूर जिल्ह्यात धुलिवंदनदिनी नव्हे तर आज रंगपंचमीला रंग खेळला जातो. ही रंगपंचमी येथील येथील आदर्शमैत्री फाउंडेशनच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पोटच्या मुलांमुळे आयुष्याचा ‘बेरंग’ झालेल्या मातोश्री या आजी-आजोबांसोबत आयुष्यात रंग भरण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आला.
आपण सर्व जण प्रत्येक सण हा आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतो. मात्र समाजापासून दुर्लक्षित, पोटच्या मुलांमुळे आयुष्याचा ‘बेरंग’ झालेल्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत रंगपंचमी साजरी केली जावी असा मानस लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशचे अध्यक्ष संतोष बिराजदार आणि सर्व संचालकांनी केला. त्यानुसार लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आदर्श मैत्री फाउंडेशनच्यावतीने ‘रंगपंचमी’ दिनी रंगांची उधळण करण्यात आली. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनीही ‘आदर्श मैत्री’च्या या रंगपंचमी उत्सवात मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित संचालक, पदाधिकाऱ्यानी आजी-आजोबांना नैसर्गिक कोरडे रंग लावून घेत प्रेमाचा स्विकार केला. तसेच संगीताच्या तालावर ठेकाही धरला. अनोख्या पद्धतीने ‘रंगपंचमी’ साजरी झाल्यामुळे वृद्धाश्रमातील जवळपास ५० आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील हास्य स्पष्टपणे दिसून येत होते. आपल्या पोटच्या मुलांनी वेगळं टाकलं तरी आपल्या मुलांसोबत-नातवांसोबत रंगपंचंमी साजरी केल्याचा आनंद झाल्याची बोलकी प्रतिक्रिया वृद्धाश्रमातील सदस्य प्रा. भरत चव्हाण यांनी व्यक्त केली.
आदर्श मंत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी उपस्थितांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आजी-आजोबानी स्वतःला एकटं समजून घेऊ नये. कारण येत्या काळातही अनेक सण-उत्सव-आनंदाचे क्षण वृद्धाश्रमात येऊन साजरे करू असा निर्धार याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. यावेळी फाऊंडेशनचे संचालक तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, निलेश राजमाने, डी.एस. पाटील कामखेडकर, राजेश मित्तल, प्रवीण सूर्यवंशी, अशोक तोगरे, उमाकांत पोफडे, तेजस शेरखाने, संपत जगदाळे, मदन भगत, आकाश जाधव यांच्यासह वृद्धाश्रमातील नरसिंह कासले, प्रा. भरत चव्हाण आदींसह जवळपास ५० आजी-आजोबांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻