ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
हदगाव (जि. नांदेड)- वरुला -महाताळा (ता. हदगाव) या गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले अविनाश बंडू भोयर (वय २६) वर्षे यांचा जन्मदात्या पित्यासह इतर तीन जणांनी कौटुंबिक कलहातून कट रचून गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
त्याचबरोबर पुरावेही नष्ट केल्याचे हदगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून जन्मदात्या पित्यानेच आपल्या उपसरपंच मुलास गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बुधवार (दि. २३) रोजी हदगाव पोलीस स्टेशन मध्ये मयत अविनाश बंडू भोयर (वय २६) वर्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली होती.
परंतु उप जिल्हारुग्णालय येथे शवविच्छेदनाअंती गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचा हेतू तसेच आरोपी निष्पन्न करण्याचे बिकट आव्हान हदगाव पोलिसांसमोर उभे झाले होते. त्यानुसार हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांढरे, पोलीस उपनिरीक्षक खैरे, फोलाने, जमादार विश्वनाथ हंबर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चिंतले, सातपुते, वाडकर, पांचाळ, भीमराव नरवाडे, होमगार्ड गणेश गिरबिडे यांच्या सहकार्याने वरुला गाव गाठत सर्व प्रकरणाची गोपनीय माहिती घेतली. तेव्हा मयत उपसरपंचाचे वडील आरोपी बंडू शेषराव भोयर (वय ५८) रा. वरुला (ता. हादगाव), राजाराम देवराव जाधव (वय ५८) रा.वाटेगाव (ता. हदगाव), विठ्ठल भगवानराव अंभोरे (वय २८ रा.गौळबाजार (ता. कळमनुरी, विलास गोविंदराव शिंदे (वय ४३) रा.बाभळी (ता.कळमनुरी) यांनी कौटुंबिक कलहातून कट रचून गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच याबाबतचे पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक खैरे यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन हदगाव येथे खुनाचा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वच्या सर्व आरोपींना हदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती हदगाव पोलिसांकडून देण्यात आली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻