ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दि.१ एप्रिलपासून नांदेडमध्ये शासकीय कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वारांना हेल्मेट घालून जाणे आवश्यक असणार आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच त्यांचा परवाना तीन महिने निलंबित करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या स्वाक्षरीने आज बुधवार दि. 30 मार्च रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयात येतांना प्रत्येक दुचाकी वाहन चालकाने अर्थात नागरीक, कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हे महत्वाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 22 मार्च रोजी असे हेल्मेट वापरण्याचे परिपत्रक जारी केलेले आहे. या सर्व आदेशांचा संदर्भ देवून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या नागरीक, कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. खासकरून शासकीय कार्यालयात येतांना तर दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हा आदेश एक एप्रिलपासून लागू राहिल. बिना हेल्मेट शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांवर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार 500 रुपये दंड आणि त्यांचा दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यासाठी निलंबित होणार आहे. यासंदर्भाने शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरीक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हेल्मेट परिधान करूनच दुचाकीवर प्रवास करायचा आहे. असे आवाहन डॉ. विपीन यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻