ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- हातात नकली पिस्तूल, तलवार दाखवून आम्ही दादा असल्याचे दाखवत व्हाट्सअपवर स्टेटस ठेवणे किंवा सोशल मीडियावर टाकणे सांगवी परिसरातील चार जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने चार जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील शारदानगर परिसरातील सन्मित्र कॉलनीत राहणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास दोन पिस्तूलधारी युवकांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी जवळपास 50 हून अधिक अग्निशस्त्र म्हणजेच पिस्तूल प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची कसून चौकशी केली. दरम्यान काही तरुण स्वतःला दादा समजून आपल्या सोशल माध्यमांच्या अकाऊंटवर, व्हाट्सअप स्टेटसवर हातात असली किंवा नकली पिस्तूल, तलवार व घातक शस्त्र घेऊन आपले फोटो व्हायरल करतात. तपासात पोलिसांनी अशा या चार युवकांना अटक केली आहे.
सोशल मीडियावरवर आक्षेपार्ह मजकूर किंवा पोस्ट व्हायरल केल्यानंतर त्याची दखल पोलीस विभागाचा सायबर सेल क्षणोक्षणी घेत असते. अफवा पसरवणे, हातात घातक शस्त्र दाखवून फोटो काढणे हे सांगवी परिसरातील चार जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे आणि संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू गीते, हवालदार दारासिंग राठोड व केंद्रे यांनी शोध मोहीम हाती घेत चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडील नकली पिस्तूल तर काही जणांकडे घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. या चारजणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात भादविच्या कलम 4/25, 6/ 25 कलम 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गरज नसताना नकली पिस्तूल खरे आहे म्हणून बाळगणे आणि ते सोशल मीडियावर टाकणे या तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻