ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
उदगीर (जि. लातूर): ऐतिहासिक शहर असलेल्या उदगीर इथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, कौतिकराव ठाले पाटील यांच्यासहित अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी मध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला दिग्गज साहित्यिकांसहित अनेकांनी मोठी गर्दी केली होती. मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, रामचंद्र तिरुके यांनी स्वागत केले.
तत्पूर्वी सकाळी उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संमेलस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात पारंपरिक पोशाखात शालेय विद्यार्थी, स्त्री-पुरुषांची उपस्थिती होती. या ग्रंथ दिंडीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते. मोटारसायकल रॅलीही आकर्षण ठरली. पुढील तीन दिवस ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात अनेक दर्जेदार चर्चासत्र, परिसंवाद, काव्य संमेलन तसेच इतरही अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻