ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– तीस लाख रुपयांच्या मोहात एक महिला आठ लाख रुपयांना फसविल्या गेल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा रामटेके यांना शाळेसाठी डोनेशन देतो म्हणून विश्वासात घेऊन अनोळखी दोन भामट्यांनी कॉलवरुन नांदेडला बोलावून घेतले. यानंतर तीस लाखांचे बंडल असल्याचे भासवून सदर महिलेची आठ लाख रुपयांची फसवणूक केली. दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयसमोर घडला.
गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्ता सुनंदा महेंद्र रामटेके (राहणार मनोहर कॉलनीजवळ दीनदयाल वार्ड रामनगर, गोंदिया) ह्या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या शिक्षण संस्थाही चालवतात. याच शिक्षण संस्थेसाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून बनावट नाव धारण केलेला अशोक पाटील या व्यक्तीने कॉलवरून त्यांच्याशी ओळख करून घेतली. तुमच्या संस्थेला 30 लाख रुपये डोनेशन मिळवून देतो, त्यासाठी तुम्हाला आठ लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील, असे विश्वासात घेऊन व्यवहार पक्का केला. यावेळी सदर महिला ही त्यांना नागपूरला या म्हणाली, मात्र आम्ही नागपूरला येणार नाही, तुम्हीच नांदेडला या असा निरोप पाठविला.
30 लाख रुपयांच्या आमिषाने सुनंदा रामटेके ह्या आठ लाख रुपये घेऊन नांदेडला आल्या. नांदेडला आल्यानंतर एकमेकांशी फोनवरून संवाद झाला आणि सदर महिलेला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयासमोर बोलावण्यात आले. काही वेळाने सदर महिला आणि दोन भामटे यांची भेट झाली. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयासमोर सुनंदा रामटेके यांच्याजवळ अशोक पाटील नावाचा व्यक्ती आला. त्याने आपली ओळख करून दिली. त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनंदा रामटेके यांनी त्यांच्याकडील पाचशे रुपये किमतीच्या सोळाशे नोटा असे आठ लाख रुपये दिले. आणि त्यापोटी 30 लाख रुपये म्हणून एक मोठे बंडल, ज्याच्या वरील भागावर पाचशे रुपयाच्या चार नोटा दिसत होत्या. बाजूस टेपने चिकटवून त्यावर रबर लावून त्यात उभ्या- आडव्या वह्या ठेवून खाकी रंगाचे सेलोटेपने चहूबाजूने चिटकवून पॅकिंग केलेले होते. हे 30 लाख रुपये आहेत, असे सांगून सुनंदा रामटेके यांच्या ताब्यात वह्याचे बंडल देऊन दोघेजण तातडीने निघून गेले.
सुनंदा रामटेके यांनी हे उघडून पाहिले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सुनंदा रामटेके यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे हे करत असून घटनास्थळी असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते गुन्ह्याचा तपास करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻