ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ तिकडे खा. इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण; इकडे मनसेची इफ्तार पार्टी
लातूर : मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवाना निलंगा इथे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्यात चांगलेच रान उठविले आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तयार झाले आहे. मात्र इकडे मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी निलंगा शहरात रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला निलंगा शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात माजी नगरसेवक हमीदभाई शेख, सरपंच लाला पटेल यांच्यासह मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल, जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप शेळके, ज्ञानेश्वर जाधव, विकास सूर्यवंशी, प्रदीप माने, अखिल देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
सध्या मनसे विरुद्ध धार्मिक स्थळावरील भोंगे असे वातावरण तापलेले आहे. ‘भोंग्या’मुळे असे हे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे सामाजिक सलोखा राखण्याचे कामही मनसेचे जिल्हा स्तरावरील नेते करताना दिसून येत आहे. आपल्या सामाजिक कार्यामुळे ओळखले जाणारे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्या इफ्तार पार्टीची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
तिकडे औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्या निमंत्रणाची चर्चा रंगलेली असतानाच इकडे लातूरमध्ये मनसेने दिलेल्या इफ्तार पार्टीचीही चर्चा रंगली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻