ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
उमरी (जि. नांदेड)- सोशल मीडियावरून (व्हाट्सअप) अपशब्द वापरून सतत बदनामी करणाऱ्या एकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे व्हाट्सअप वरून बदनामी करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बिलोली येथील रहिवासी संतोष विठ्ठलराव उत्तरवार (ग्रुप ॲडमिन) यांनी “महाराष्ट्र आर्य वैश्य समाज” या नावाने असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेद्र येरावार आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची तसेच महासभेतील पदाधिकाऱ्यांची सतत बदनामी करणारा मजकूर टाकून विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न चालविला होता.
याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वी अनेक वेळा संतोष उत्तरवार यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला होता. म्हणून येरावार हे सदरच्या ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर देखील ग्रुप ॲडमिन संतोष उत्तरवार यांनी पुन्हा येरावार यांना 24 एप्रिल 2022 रोजी ग्रुप मध्ये समाविष्ट केले आणि जाणून बुजून लगेचच बदनामी करणारा मजकूर टाकला. केवळ आणि केवळ बदनामी करण्यासाठी ग्रुप ॲडमिन संतोष उत्तरवार बिलोली यांनी बदनामी करण्यासाठी ग्रुपचा गैरवापर केला. महासभेचा आणि त्यांचा कसल्याच प्रकारचा संबंध नसताना देखील विनाकारण त्यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून महासभा आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करणारा मजकूर वारंवार ग्रुपवर टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला.
अनेक वेळा विनंती करून देखील संतोष उत्तरवार यांनी जाणून-बुजून विनाकारण बदनामी करणारा मजकूर टाकल्यामुळे राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांनी उमरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ग्रुप ॲडमिन संतोष उत्तरवार यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे तसेच यासंदर्भात त्यांनी उमरी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल केला आहे. शिवाय महासभेचे राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांनी देखील जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. व्हाट्सअप ग्रुप वरून बदनामी करणारा मजकूर टाकल्याने हे प्रकरण ग्रुप ऍडमिनला महागात पडले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻